रेल्वे ‘जीएम’च्या राजेशाही थाटातील निरीक्षणावर चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे ‘जीएम’च्या राजेशाही 
थाटातील निरीक्षणावर चाप
रेल्वे ‘जीएम’च्या राजेशाही थाटातील निरीक्षणावर चाप

रेल्वे ‘जीएम’च्या राजेशाही थाटातील निरीक्षणावर चाप

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः रेल्वेच्या सरव्यवस्थापकांचे (जीएम) प्रत्येक विभागात मोठ्या थाटात चालणाऱ्या वार्षिक निरीक्षणाला अखेर रेल्वे बोर्डाने चाप लावला आहे. पंचतारांकित सुविधा असलेल्या सलूनसह शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची फौज आता इथून पुढे जीएम यांच्यासाठी तैनात नसेल. रेल्वे बोर्डचे नूतन अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी याबाबत आदेश दिले असून त्याची तत्काळ अंमलबजवानीही सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे विभागाचे होणारे वार्षिक निरीक्षण आता होणार नाही. परिणामी ‘जीएम’ यांच्या निरीक्षणांवर होणारा लाखो रूपयांचा खर्च आता वाचणार आहे.

वर्षातून एकदा जीएमने आपल्या कार्य क्षेत्रांतील विभागाचा वार्षिक निरीक्षण करणे अनिवार्य होते. त्यासाठी वर्षाच्या शेवटी जीएमचे दौरे आयोजित केले जात. ‘जीएम’च्या दौऱ्यासाठी विभागातील पूर्ण यंत्रणा काम करायची. जीएमसोबत प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासाठी स्वतंत्र डबा असलेली रेल्वे धावायची. शिवाय ज्या स्थानकावर, ज्या सेक्शनमध्ये निरीक्षण असेल त्या ठिकाणी रंगरंगोटीपासून अन्य कामांवर मोठा खर्च होत. जीएमसोबत येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांसाठीदेखील चांगली सुविधा द्यावी लागते. त्यामुळे जीएमचे निरीक्षण म्हणजे लाखोंची उधळपट्टी हे ठरलेलेच असायचे. मात्र, आता हे सर्व बंद झाले आहे. ‘जीएम’ वर्षातून कधीही पूर्वकल्पना न देता तसेच कोणताही तामजाम न करता अगदी साधेपणाने निरीक्षण करतील.