राज्यात थंडी वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात थंडी वाढणार
राज्यात थंडी वाढणार

राज्यात थंडी वाढणार

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : राज्यात धुके आणि ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाचा पारा वाढत होता. मात्र आता पुन्हा तापमानात घट होत असल्याने गारठा वाढत असून विदर्भात काही ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली गेला आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ९) विदर्भाच्या काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
तापमानातील चढ-उतार कायम असताना रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढत आहे. नागपूर, गोंदिया येथे थंडीची लाट जाणवली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे ६.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी, तर मराठवाड्यात १ ते ४ अंशांनी घट झाली.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात घट झाली होती. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तसेच मराठवाडा परिसरात बहुतांश भागात तापमानात घट अपेक्षित असून किमान तापमान १० अंशांच्या खाली जाऊ शकते.

पुण्यात काहीसा गारठा
पुणे शहर आणि परिसरात तुरळक ठिकाणी शनिवारी रात्री ढगाळ वातावरणाची स्थिती होती. मात्र शहरात झपाट्याने झालेली किमान तापमानातील वाढ आता पुन्हा खाली घसरत आहे. रविवारी शहरात १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सोमवारपासून (ता. ९) पुढील तीन ते चार दिवस शहरात गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या किमान तापमानात वाढ असली तरी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होत असल्याने काहीसा गारठा अनुभवता येत आहे.

विदर्भात पारा घसरला ः
ठिकाण ः किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला ः ११
बुलडाणा ः ११.५
अमरावती ः १०.४
ब्रह्मपुरी ः ९.६
चंद्रपूर ः १०.२
गडचिरोली ः ९.६
गोंदिया ः ६.८
नागपूर ः ८
वर्धा ः ९.४
यवतमाळ ः १०.७

चुरू @ ०.५ अंश सेल्सिअस
उत्तर भारतात थंडीची लाट असताना रविवारी देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी तापमानाची नोंद राजस्थानच्या चुरू येथे ०.५ अंश सेल्सिअस झाली. सध्या उत्तर राजस्थान, दिल्ली, हरियाना, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी थंडीची लाट आली आहे. तर पश्‍चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील हिमालयातील काही भागात बर्फवृष्टी/पावसाची स्थिती दिसून येत आहे. यामुळे हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, तेलंगण या राज्यांच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.