समांतर परवान्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समांतर परवान्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता
समांतर परवान्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता

समांतर परवान्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता

sakal_logo
By

पुणे, ता. १० : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वीज वितरणासाठी महावितरणसोबत टोरेंट पॉवर लिमिटेड या खासगी कंपनीला समांतर परवानगी मिळाल्यास नागरिकांना वीज खरेदीसाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो, परंतु स्वतंत्र वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे आणि त्याद्वारे वीज वितरण करणे किती फायदेशीर ठरू शकते, तसेच त्याचा फायदा ग्राहकांना किती मिळेल, याबाबत आता सांगणे शक्य नाही, असे मत वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वीज कायदा तरतुदीचा आधार घेत पुणे व परिसरात महावितरणाबरोबरच वीज वितरणासाठी समांतर परवाना मिळावा, यासाठी या कंपनीने वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. वीज आयोगाने त्यास मंजुरी दिल्यास नागरिकांना महावितरण किंवा संबंधित कंपनीकडून वीज खरेदीचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढणार असली, तरी स्वतंत्र वीज वाहिन्यांचे जाळे उभारून वीज वितरण प्रचंड खर्चिक आहे. परिणामी वीज दरात ग्राहकांना नेमका किती फायदा मिळेल, याबाबत साशंकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, वीज ग्राहकांना वीज खरेदीचे पर्याय उपलब्ध झाले, तर त्यातून वीज वितरण कंपन्यांमध्ये सेवेची स्पर्धा वाढेल. त्याचा फायदा ग्राहकांना होईल. वीज ग्राहकांना कार्यक्षमता व गुणवत्तापूर्ण सेवा हवी आहे. महावितरणने चांगली सेवा दिल्यास ग्राहक त्यांच्याकडे टिकून राहतील.’’

स्वतंत्र जाळे उभारण्याची गरज नाही!
प्रायास उर्जा गटाचे शंतनू दिक्षित म्हणाले, ‘‘मुक्त वीज खरेदी पद्धतीत वीज वितरणासाठी स्वतंत्र जाळे टाकण्याची गरज भासत नाही. महावितरणचे नेटवर्क वापरून सुद्धा खासगी कंपन्यांना वीज वितरण करता येऊ शकते. त्यातून ग्राहकांना वीज खरेदीचे पर्याय उपलब्ध होतात. परिणामी स्पर्धात्मक दराचा फायदा मिळू शकतो. स्वतंत्र वीज वाहिन्यांचे जाळे वापरून वीजेचे वितरण हे किफायतशीर ठरत नाही. त्यातून वीज वितरण कंपनीचा खर्च वाढतो. हा खर्च वीजबिलातून वसूल केला जातो, परंतु वीजेचे दर नेमके किती असतील, त्याचे नियमन कसे करणार, याबाबत कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल. ‘क्रॉस सबसिडी’वरही त्याचा परिणाम होऊ शकतो.’’