विद्यापीठात रंगणार संशोधनांचा ‘आविष्कार’ आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ः राज्यपालांच्या हस्ते होणार उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात रंगणार संशोधनांचा ‘आविष्कार’

आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ः राज्यपालांच्या हस्ते होणार उद्‌घाटन
विद्यापीठात रंगणार संशोधनांचा ‘आविष्कार’ आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ः राज्यपालांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

विद्यापीठात रंगणार संशोधनांचा ‘आविष्कार’ आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ः राज्यपालांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘१५ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन’ (आविष्कार) येत्या १२ ते १५ जानेवारी दरम्यान होणार आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी (ता.१२) दुपारी चार वाजता होणार आहे.

हे आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन २००६-०७ पासून आयोजित करण्यात येते. यात राज्यातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी सहा विद्याशाखांमध्ये आपले प्रकल्प सादर करतात. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष हे संमेलन झाले नाही. पुणे विद्यापीठाच्या स्व. प्रा. एम. आर. भिडे आविष्कार नगरी, खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे हे संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आणि आविष्कार समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित असतील.
या स्पर्धेत विविध प्रकल्पांचे सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन, संगणकीय सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. आविष्कार स्पर्धेचा अंतिम निकाल १५ जानेवारीला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती डॉ. ढोले यांनी दिली.

‘आविष्कार’स्पर्धेचे वैशिष्ट्य
- राज्यातील २२ विद्यापीठांचा सहभाग
- दोन हजारांपासून बक्षीसे ते एक वर्षासाठी एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण ४८ प्रकल्प स्पर्धेत
- २००६ पासून आतापर्यंत १४ स्पर्धा झाल्या
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९ वेळा विजेते तर ४ वेळा उपविजेता ठरले

६४९ संशोधन प्रकल्प होणार सादर
मानव्यविद्या आणि भाषा, विज्ञान, औषध व औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आदी सहा विद्याशाखांमध्ये एकूण ६४९ विद्यार्थी प्रत्येकी एक याप्रमाणे ६४९ संशोधन प्रकल्प सादर होणार आहेत.