‘एमटीडीसी’च्या उपाहारगृहात मिळणार पौष्टिक न्याहरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमटीडीसी’च्या उपाहारगृहात मिळणार पौष्टिक न्याहरी
‘एमटीडीसी’च्या उपाहारगृहात मिळणार पौष्टिक न्याहरी

‘एमटीडीसी’च्या उपाहारगृहात मिळणार पौष्टिक न्याहरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) पर्यटक निवासांत पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ न्याहरीसाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच पर्यटकांचे पर्यटन आरोग्यादायी घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला जाणार आहे.

वर्षभर घेता येणार स्वाद
एमटीडीसीच्या सर्व उपाहारगृहांत पौष्टिक तृणधान्य म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा पिकांच्या विविध आणि रुचकर पाककृती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी विविध उपक्रम ही राबविण्यात येणार आहेत. पुढील वर्षभर हे पदार्थ पर्यटकांना उपाहारगृहात उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे औरंगाबादचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी विविध संकल्पना
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कृषी विभागाशी समन्वय करून पौष्टिक तृणधान्याबाबत विविध कार्यक्रम राबविणे, स्थानिक शेत ते थेट पर्यटक अशा संकल्पना राबविणे, मोकळ्या जागेमध्ये शक्य असेल त्या ठिकाणी पौष्टिक तृणधान्याची लागवड करणे, स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वयाने पर्यटकांची शेत सहल आयोजित करणे, अशा संकल्पना अंमलात आणून पर्यटकांचे आरोग्यदायी पर्यटन घडवून आणावे, अशा सूचना एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दिल्या आहेत.

काय असणार खासियत ः
- निवास आणि उपाहारगृहाच्या दर्शनी भागात पौष्टिक तृणधान्य पदार्थ उपलब्धतेबाबत फलक
- आहारमुल्याबाबत बोधचिन्हासह फलक
- स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने हुरडा पार्टीचे (ज्वारी) आयोजन

स्थानिक बचत गट, शेतकरी यांच्यामार्फंत नाचणीचे वाळलेले खाद्यपदार्थ (पापड, कुरडया, बिस्किट) पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. शक्य असलेल्या ठिकाणी स्थानिक अल्प भू-धारक शेतकऱ्यांना महामंडळाच्या पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
- दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, औरंगाबाद