
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराप्रकरणी सक्तमजुरी
पुणे, ता. ११ : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दिली होती.
घटनेच्या वेळी मुलगा नऊ वर्षांचा होता. मुलाचे वडील डॉक्टर असून त्यांचा दवाखाना आहे. त्या दवाखान्यात आरोपी कर्मचारी होता. मुलगा अधूनमधून वडिलांच्या दवाखान्यात जात असत. आरोपीने त्याच्याशी जवळीक साधून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. तसेच ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. घरी आल्यावर मुलगा घाबरलेला असल्यामुळे त्याच्याकडे त्याच्या आईने चौकशी केली. त्यावेळी त्याने घडलेली घटना त्याच्या आईला सांगितली. त्यानंतर मुलाच्या आईने आरोपी विरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा निष्पन्न झाल्यामुळे दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी पाहिले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनुराधा भोसले यांनी केला. पोलिस कर्मचारी नीलेश पुकाळे, के. आर. रेणुसे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.