
जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ देणार ‘व्हीडीजी’ प्रशिक्षण
पुणे, ता. १० ः जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी व पूँछ या जिल्ह्यात सातत्याने दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. यामध्ये नागरिकांची जीवितहानी होत असल्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) या भागात अतिरिक्त जवानांना तैनात केले आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने येथील ग्राम संरक्षण रक्षकांना (व्हीडीजी) सीआरपीएफद्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राजौरीतील धनगरी गावात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच ते सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागातील सुरक्षा वाढविण्याकरिता हे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे. व्हीडीजीच्या रक्षकांना सीआरपीएफद्वारे शस्त्रास्त्रांचे तसेच लढाऊ कारवाईसाठी शारीरिक प्रशिक्षण दिले जाईल. ज्यामुळे ते दहशतवादी हल्ल्यांच्या प्रसंगी स्थानिकांच्या संरक्षणाबरोबर सुरक्षा दलांना देखील मदत करतील. मात्र ज्या ग्रामस्थांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना असेल अशांना शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
काय आहे व्हीडीजी?
पूर्वी व्हीडीजी हे ‘ग्राम संरक्षण समिती’ (व्हीजीसी) म्हणून ओळखले जात होते. १९९५ च्या दशकात प्रशासनाने दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी याची स्थापन केली. यामध्ये गावातील स्वयंसेवकांना लष्कर आणि पोलिसांकडून प्रशिक्षण दिले जात होते. या योजनेंतर्गत व्हीडीसीला शस्त्रे देण्यात आली. ज्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या गावांचे दहशतवादी हल्ले आणि दहशतवादी कारवायांपासून विशेषतः जम्मू प्रदेशातील डोंगराळ भागातील असुरक्षित गावांचे संरक्षण केले. परंतु नंतर त्याचा गैरवापर होत असल्याचे लक्षात येताच या योजनेवर काही निर्बंध आली. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, विशेषतः: ज्या भागात पूर्वीची योजना कार्यान्वित होती त्या भागात, दहशतवादी कारवायांच्या घटना रोखण्यासाठी विद्यमान योजनेत सुधारणा करण्याची गरज भासू लागली. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये व्हीडीसी योजना-२०२२ च्या निर्मितीला मंजुरी दिली होती, जे १५ ऑगस्ट २०२२ पासून लागू झाली. राजौरी व पूँछ येथे वाढलेल्या दहशतवादी हालचालींमुळे पुन्हा या योजनेला सुरवात करण्यात येत आहे. मात्र आता याला ‘ग्राम संरक्षण रक्षक’ (व्हिलेज डिफेन्स गार्डस) असे नाव देण्यात आले आहे.
अशी आहे स्थिती ः
- राजौरी येथील धनगरी गावात झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे ग्राम संरक्षण समित्या (व्हीडीसी) पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन करण्यात आले.
- राजौरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये व्हीडीसी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
- ग्रामस्थांना ‘सेल्फ-लोडिंग रायफल’ (एसएलआर) देत सीआरपीएफ तसेच लष्करी जवानांद्वारे प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे.
- सीआरपीएफ व लष्कराद्वारे व्हीडीसीच्या रक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम होत आहेत.
गरज का ?
- ग्राम संरक्षण रक्षक योजना स्थानिक लोकांमध्ये सुरक्षेच्या बाबतीत स्वसंरक्षणाची वृत्ती निर्माण करणे
- घुसखोरीच्या हालचालींना तसेच दहशतवादी हल्ल्यांमुळे होणाऱ्या विध्वंस रोखण्यासाठी सुरक्षा दलांना मदत करणे
- राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नांसाठी ग्रामस्थांचा सक्रियपणे सहभाग वाढविणे