
महिन्यात १३५ वीज चोरीच्या घटना उघडकीस
पुणे, ता. १७ : महावितरणच्या भरारी पथकाने गेल्या महिन्यात भोसरी, उरुळीदेवाची व इस्लामपूर येथे छापा टाकून तीन कोटी ६८ लाख रुपयांच्या १३५ वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या. तर इतर अनियमिततेच्या १३९ प्रकरणांत तीन कोटी ८६ लाखांची बिले देण्यात आली.
भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकून बेकरी प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीची वीजचोरी उघडकीस आणली. या औद्योगिक ग्राहकाने अतिरिक्त एलटी केबल टाकून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या ग्राहकाने एक लाख ५५ हजार युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला २१ लाख, ८९ हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले.
दुसऱ्या घटनेत उरुळीदेवाची परिसरातील पेट्रोल पंप व्यावसायिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आली. या ग्राहकांनी एलटी केबलला टॅपिंग करून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. सदर ग्राहकांनी ३९ हजार ६२७ युनिट्सची वीजचोरी केल्याचे उघड झाले असून त्याला १६ लाख १८ हजार ४२० रुपयांचे बिल दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे स्वीट मार्ट व्यावसायिकाने मीटरमध्ये घोळ करून वीजचोरी केल्याने त्याला ७६ हजार ५०४ युनिटचे १७ लाख ५२ हजार रुपयांचे बिल दिले आहे. पुणे शहर व इस्लामपूर शहरातील इतर भागात छापा टाकून १३५ वीजचोऱ्या पकडल्या तर इतर अनियमिततेची १३९ प्रकरणे उघडकीस आणली असल्याची माहिती महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.