विमानाचे इंधन चोरणारी टोळी जेरबंद

विमानाचे इंधन चोरणारी टोळी जेरबंद

पुणे, ता. ९ : विमानासाठी लागणारे इंधन टँकरमधून चोरणाऱ्या बड्या रॅकेटचा हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाचजणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून आठ टँकरसह २४ हजार लिटर इंधन असा सुमारे सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
टॅंकरचालक सुनीलकुमार प्राणनाथ यादव (वय २४ रा. हडपसर, मूळ रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश), दाजीराम लक्ष्मण काळेल (वय ३७, हडपसर, मूळ रा. वळई, ता. माण, सातारा), ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक सचिन रामदास तांबे (वय ४०, रा. हडपसर), सुनील रामदास तांबे (वय ३८ रा. हडपसर) आणि शास्त्री कवल सरोज (वय ४८, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून हडपसर परिसरात पेट्रोलियम कंपन्यांच्या टॅंकरमधून पेट्रोल, डिझेल चोरी होत असल्याची कुणकूण होती. हडपसर पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, नवी मुंबईतील वाशी येथून विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल (एटीफ पेट्रोल) आणि डिझेल भरून टँकर हे शिर्डी विमानतळाकडे निघाले आहेत. इंधन कंपनीकडून प्रवासाचा मार्ग आणि वेळ निश्चित केली होती. तसेच, टँकरला पेट्रोल चोरी होवू नये, यासाठी यंत्रणा (ॲटोलॉक) बसविली होती. तरीही हडपसर परिसरात आरोपींकडून इंधन चोरी होत असल्याची माहिती पोलिस अंमलदार मनोज सुरवसे यांना मिळाली.
या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिसांनी शनिवारी (ता. ८) सकाळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी दोन टँकरमधून इंधन चोरी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पेट्रोलचे आठ टँकर, १४ पेट्रोल कॅन आणि इलेक्ट्रिक मोटरपंप असा दोन कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे सोपविला आहे.

विमानात वापरण्यात येणाऱ्या इंधनावर इतर आलिशान चारचाकी, दुचाकी वाहनेही धावू शकतात. विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाची चोरी करून ते नेमके कोणाला विकले जाते? लाखो रुपये खर्च करून टॅंकरला ऑटोलॉक करूनही इंधन चोरी कशी होते?. तसेच या रॅकेटमागे कोण प्रमुख सूत्रधार आहेत, त्यांचे लागेबांधे शोधण्यासाठी पोलिसांनी मूळापर्यंत जाण्याची गरज आहे.
- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com