
ईस्टर संडेच्या प्रार्थनेने रविवारी उपवासाची सांगता
पुणे, ता. ९ ः ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सप्ताह आणि ४० दिवसांच्या उपवासाची सांगता ईस्टर संडेच्या प्रार्थनेने रविवारी (ता. ९) झाली. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, अशा दोन्ही संप्रदायांच्या चर्चमध्ये धर्मगुरूंच्या उपस्थितीत ख्रिस्ती बांधवांनी विशेष प्रार्थना केली.
ईस्टर संडेची सुरुवात भल्या पहाटे काढलेल्या पुनरुत्थान दिंड्यांनी झाली. पहाटे चार वाजता ठिकठिकाणी काढलेल्या दिंड्यांमध्ये भाविक सहकुटुंब सहभागी झाले होते. सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या संगीत महाविधीनंतर भाकरी व द्राक्षांच्या रसाचे वाटप धर्मगुरूंनी केले. प्रभातफेरीनंतर धर्मगुरूंनी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची कथा भाविकांना सांगितली. काही चर्चमध्ये रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर भरविण्यात आले, अशी माहिती चर्च ऑफ द होली नेम (सीएनआय) ख्रिश्चन धर्माचे कार्यकर्ते सुधीर चांदेकर यांनी दिली.
‘ईस्टर’ हा ख्रिस्ती लोकांसाठी नाताळाइतकाच महत्त्वाचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. या अभूतपूर्व घटनेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. शहरातील चर्च ऑफ द होली नेम (सीएनआय), इमॅन्युअल चर्च, सेंट मेरी चर्च, ब्रदर देशपांडे चर्च, सेंट मॅथ्युज चर्च, सेंट मेरी चर्च आदी ठिकाणी धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात हा सण पार पडला. ईस्टरनिमित्त सुधीर गायकवाड, सुधीर पारकर, रूपेश शिंदे, फ्रान्सिस कसबे, चंद्रशेखर जाधव, संजय ठाकूर, अभिषेक रॉजर्स, सुरेंद्र शिरसाट, जयप्रकाश आढाव यांनी शांतीचा संदेश दिला.