
ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले
पुणे, ता. १३ : ग्रामपंचायतीमध्ये आठ ‘अ’ उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मावळ तालुक्यातील एका ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विलास तुकाराम काळे (वय ४६) असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. काळे हा मावळ तालुक्यातील खडकाळे-कामशेत ग्रामपंचायतीमध्ये नियुक्तीस आहे. ‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या जागेवर पत्र्याच्या शेडची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी काळे यांची भेट घेतली. त्यावेळी काळे याने आठ ‘अ’ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे येथील कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करून ‘एसीबी’च्या पथकाने काळे यास लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.