राजकीय संस्कृती जपणे हीच खरी श्रद्धांजली
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना

राजकीय संस्कृती जपणे हीच खरी श्रद्धांजली दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना

पुणे, ता. १६ : सर्वपक्षीयांशी मैत्री जपणारा, परंतु पक्षाच्या विचारांशी कधीही तडजोड न करणारा, सर्वसामान्यांचे प्रश्‍न हिरीरीने मांडणारा अन्‌ प्रसंगी भांडणारा, परंतु तेवढ्याच्य आवडीने हाताने स्वयंपाक करून वाढणारा नेता म्हणून गिरीशभाऊ सगळ्यांना आपले वाटत होते, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांना रविवारी श्रद्धांजली वाहिली. अलीकडच्या काळातील राजकारण पाहता, बापट यांनी आयुष्यभर जी राजकीय संस्कृती जपली, ती पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे संपर्कप्रमुख सचिन अहिर, मनसे नेते बाळा नांदगावकर, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अंकुश काकडे, ‘सीटू’चे अध्यक्ष अजित अभ्यंकर, गौरव बापट, स्वरदा बापट यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, खासदार, शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘बापट यांनी आयुष्यभर मैत्री जपली, परंतु पक्षाच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही,’’ असे सांगून शरद पवार म्हणाले, ‘‘राजकारणात एक समंजसपणा असावा लागते. तो बापट यांच्याकडे होता. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी मैत्री जपली.’’ तर गडकरी म्हणाले, ‘‘निवडणुकीनंतरही त्यांनी कुठलेही मतभेद मानले नाहीत. सर्वांशी उत्तम संबंध ठेवले. पक्षाशी कायम प्रामाणिक राहिले. ते पक्षाची मोठी ताकद होती.’’

‘‘बापट हे सर्वांशी दोस्ती करणारे व्यक्ती होते,’’ असे सांगत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बापट यांच्यावर कविता करून रामदास आठवले म्हणाले, ‘‘त्यांनी कधी मानली नाही जात, म्हणून त्यांना कायम मिळाली सर्वांची साथ.’’ तर जावडेकर म्हणाले, ‘‘आयुष्यभर त्यांनी पक्षाचा वसा घेतला होता, आणि शेवटपर्यंत तो जपला.’’ तर सचिन अहिर म्हणाले, ‘‘बापट हे भाजप-शिवसेना युतीमधील मोठा दुवा होते.’’ चंद्राकांत पाटील म्हणाले, ‘‘माझे राजकीय जीवन स्थिर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आयुष्यभर इतरांना मोठे करण्याचा प्रयत्न केला.’’ तसेच ‘‘खांद्यावर डोकं ठेवून रडावं असा मित्र होता,’’ अशा शब्दांत श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘‘बापट यांच्या घराण्याचा वारसा असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी विचार करावा,’’ अशी अपेक्षा महादेव जानकर यांनी व्यक्त केली. तर ‘‘दुर्मीळ पक्षनिष्ठा असलेले आणि सर्वपक्षसमभाव मानणारे नेते बापट होते,’’ असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. या वेळी अनेक मान्यवरांची भाषण झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर अंकुश काकडे यांनी प्रस्ताविक केले. गौरव बापट यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. या प्रसंगी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आठवणींनी अश्रू अनावर...
भाषणादरम्यान काकडे, उल्हास पवार यांना बापट यांच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले. अडीच तासांहून अधिक काळ चाललेल्या या श्रद्धांजली सभेत अनेकांनी बापट यांच्याबद्दलच्या आपल्या वैयक्तिक आठवणींनाही उजाळा दिला.

३७४३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com