
वेळ आली होती, पण काळ आला नव्हता
योगीराज प्रभुणे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १८ : ‘‘मुलगी ‘डिलिव्हरी’साठी माहेरी आली होती. आठवा महिना होता. पहाटेपासूनच अचानक पोटात दुखू लागले. जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांनी तपासले आणि तातडीने कमला नेहरू रुग्णालयात पाठविले. येथे आल्यानंतर मुलीची अवस्था बघून तिची प्रसूती करण्यात आली. कमला नेहरू रुग्णालयात येईपर्यंत आम्ही हवालदिल झालो होतो. आमच्यावर वेळ आली होती, पण काळ आला नव्हता..’’ कमला नेहरू रुग्णालयात प्रसूती झालेल्या गर्भवतीची आई बोलत होती...
प्रसूती होऊन काही तास लोटले होते. पण, त्या आठवणीने अजूनही ती थरथर कापत होती. त्याच अवस्थेत शक्ती एकवटून त्या म्हणाल्या, ‘‘पुण्यात चांगले दवाखाने आहेत, म्हणून पहिल्याच ‘डिलिव्हरी’साठी मुलीला हट्टाने पुण्यात आणले. त्यात काही चुकीचे झाले असते तर, जावयाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. ही भीती सगळ्यात मोठी होती.’’
पायाभूत आरोग्य सेवा विस्कळित
मुंबई महापालिका कायद्यानुसार, शहराच्या हद्दीमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर निश्चित केली आहे. त्यामुळे शहरात प्रसूती आणि प्रसूतिपूर्व सेवा देण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असते. मात्र, शहरातील कमला नेहरू आणि सोनवणे या दोनच रुग्णालयांमध्ये आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रसूती केल्या जातात. महापालिकेच्या इतर रुग्णालयांमधून या रुग्णांना या दोन ठिकाणी पाठविले जाते. या गर्भवतीच्याबद्दलही हीच घटना घडली. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत आरोग्य सेवा विस्कळित झाल्याचे दिसते.
पाच बालरोगतज्ज्ञांकडून सेवा
महापालिकेची १८ प्रसूती केंद्र आहेत. त्यापैकी काही प्रमाणात आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची प्रसूती फक्त कमला नेहरू आणि सोनवणे रुग्णालयात होते. उर्वरित १६ रुग्णालयांमधून रुग्णाला संदर्भ सेवा दिली जाते. तसेच, जेमतेम पाच बालरोगतज्ज्ञांकडून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या बालकांना आरोग्य सेवा मिळत आहे.
वर्ग एकच्या ७५ टक्के जागा रिक्त
आरोग्य अधिकारी, उपआरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिक्षक या चार प्रशासकीय पदांसह वेगवेगळ्या ३० वैद्यकीय शाखेतील विशेष तज्ज्ञांच्या १४२ जागा मंजूर केल्या आहेत. त्यापैकी फक्त ३६ जागा (२५ टक्के) भरलेल्या आहेत. उर्वरित १०६ जागा (७५ टक्के) रिक्त आहेत. त्यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाची ‘अत्यवस्थ’ झालेली स्थिती स्पष्ट होते.
शहरात गेल्या वर्षी १७ हजार १०६ गर्भवतींची नोंद झाली होती. तर, सात हजार ५३२ प्रसूती झाल्या होत्या. या रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही पदे ही करार तत्त्वावर भरण्यात आली आहेत.
- डॉ. प्रल्हाद पाटील,
आरोग्य प्रशासकीय अधिकारी
महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये किती स्त्री रोग तज्ज्ञ आहेत, यापेक्षा त्या केंद्रांमध्ये पात्र स्त्री रोग तज्ज्ञ आहे ना?, हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे मंजूर केलेल्या जागांप्रमाणे तेथे तज्ज्ञ डॉक्टर असणे आवश्यक आहे. त्यातून उपनगरांमधील प्रसूती केंद्रांमध्येही रुग्णांची योग्य काळजी घेता येईल.
- डॉ. पराग बिनीवाले,
स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ
१८
महापालिकेची प्रसूती केंद्र
१६ रुग्णालये
रुग्णांना संदर्भ सेवा
कमला नेहरू व सोनवणे रुग्णालय
गुंतागुंतीची प्रसूती
१५
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या जागा
७
स्त्रीरोग तज्ज्ञ रिक्त जागा
५
भूलतज्ज्ञ जागा मंजूर
३
भूलतज्ज्ञ जागा भरल्या
१३
बालरोग तज्ज्ञ जागा
८
बालरोग तज्ज्ञ रिक्त जागा
तुमचा अनुभव सांगा...
महापालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा व विस्कळित पायाभूत सुविधांबाबत तुम्हालाही काही अनुभव आला आहे का?, तसेच त्याचा फटका रुग्णाला बसला आहे का? याबाबत तुमचे मत मांडा...