दरीत फक्त किंचाळ्या कानी पडल्या !

दरीत फक्त किंचाळ्या कानी पडल्या !

पुणे, ता. १८ : ‘‘त्या रात्री जेवण आटोपून आम्ही पहाटे साडेतीन वाजता मुंबईला निघालो. दिवसभर प्रवास व वादनामुळे दमल्याने सगळे जण झोपलेलो. बस वेगात घाटात एका दुभाजकाला धडकली आणि पुढे काही कळण्याच्या आत दरीत कोसळली. उडणारी धुळ अन्‌ किर्ररं अंधारात फक्त सगळ्यांच्या किंचाळ्या कानावर पडत होत्या. सगळे जण रक्तबंबाळ होते, मी वाचलोय, याची जाणीव झाली. १९ वर्षांचा कार्तिक सुमंत बारोत ‘त्या’ रात्रीचा अपघाताचा प्रसंग सांगताना एकीकडे अंगावर शहारे उमटत होते अन्‌ दुसरीकडे डोळ्यांतून अश्रू वाहत होते !
स्वतःला सावरून मी पोलिसांना फोन केला. पुढच्या १० मिनिटांत पोलिस, रुग्णवाहिका पोचल्यानंतर मदत सुरू झाली, पण आता माझे काही मित्र-मैत्रिणी मला केव्हाच दिसणार नव्हते, ही वेदना मनात सलत गेली, असेही तो अश्रू आवरत म्हणाला.
‘‘आम्ही पहिल्यांदाच ढोल-ताशा वादनासाठी गोरेगाव मुंबईच्या बाहेर पडलो होतो. गोरेगाव, कांदिवली व खोपोलीची मुले पथकात होती. वादनानंतर सर्व जण खूश होतो, पुढे असे काही होईल, याची कल्पना नव्हती,’’ कार्तिक सांगत होता. चालकाच्या बाजूने बस सरळ दरीत कोसळली. तेव्हा चालक, त्याच्याजवळ बसलेला समीर धुमाळ, सतीश व स्वप्नील धुमाळ हे दोन सख्खे भाऊ अशा तिघांचा जाग्यावरच मृत्यू झाला. सुदैवाने माझा मोबाईल सुरू होता. मी तत्काळ पोलिसांना फोन केला. त्यानंतर तातडीने मदत मिळाली. मीही जखमींना बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली. माझ्या आई-वडिलांना फोन करून मी सुखरूप असल्याचे व मित्रांना वाचविण्यासाठी मदत करत असल्याचे सांगितले.
खंडाळा घाटातील अपघातात श्री बाजी प्रभू ढोल ताशा पथकातील मृत्यू पावलेल्या वादकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ढोल-ताशा महासंघाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे सभा झाली. या वेळी ॲड. प्रताप परदेशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी, नितीन पंडित, उदय जगताप, अतुल बेहरे, पराग ठाकूर, संजय सातपुते, प्रवीण परदेशी, आनंद सराफ उपस्थित होते. या वेळी मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘‘महाराष्ट्रातील ढोल ताशा वादकांचे अधिवेशन घेऊन एक आचारसंहिता करण्यात येईल, त्याद्वारे वादकांना विम्याचे संरक्षण व त्यांच्या जिवाची काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येतील,’’ असे ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.

अशा पद्धतीने होणार मदत व उपाययोजना
- गणेशोत्सव मंडळे, पथकांना विमा संरक्षणासाठी निधी उभारणार
- भविष्यात पुण्यात अधिवेशन भरवून ढोल ताशा आचारसंहिता करणार
- गणेशोत्सव मंडळे अपघातग्रस्त मुलांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक आधार देणार
- रात्रीचा प्रवास व जीवघेण्या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणार

PNE23T38094

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com