‘स्व-रुपवर्धिनी’च्या चऱ्होली 
केंद्राचे रविवारी उद्‍घाटन

‘स्व-रुपवर्धिनी’च्या चऱ्होली केंद्राचे रविवारी उद्‍घाटन

पुणे, ता. २१ ः स्व-रूपवर्धिनी या सामाजिक संस्थेच्या चऱ्होली विस्तार केंद्राच्या उद्‍घाटन कार्यक्रमाचे रविवारी (ता. २३) आयोजन करण्यात आले आहे. या वेळी वसतिगृहाचेही भूमिपूजनही विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांच्या हस्ते पार पडणार आहे. समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेली स्व-रूपवर्धिनी आता कौशल्य विकास केंद्राद्वारे मोठ्या विस्ताराकडे वळत आहे.

नवी पेठेतील पत्रकार संघात नुकतीच या संबंधीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, कार्यवाह विश्वास कुलकर्णी, समन्वयक अद्वैत कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष डॉ. संजय तांबट उपस्थित होते. या वेळी पटवर्धन म्हणाले, ‘‘नोव्हेंबर २०१९ मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले. समाजातील दानशूर व्यक्तींबरोबरच अनेक न्यासांच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पहिला टप्पा पूर्ण होत आहे. महिला आणि विद्यार्थिनींच्या आत्मनिर्भरतेसाठी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना प्राधान्य देण्यात येईल.’’ चऱ्होली बुद्रुक येथील पठारे मळ्यात असलेल्या या केंद्राचा उद्‍घाटन कार्यक्रम सकाळी नऊ ते ११ या वेळेत पार पडेल.

केंद्रातील अभ्यासक्रम ः
- सर्टिफिकेट कोर्स इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
- सर्टिफिकीट कोर्स इन मेडिकल रेकॉर्ड
- सर्टिफीकीट कोर्स इन जीएनॲन्ड एम असिस्टंट
- डिप्लोमा कोर्स इन सायकोथेरपीस्ट
- रुग्णसहायक अभ्यासक्रम, कथक नृत्य प्रशिक्षण, फॅशन डिझाईन आदी

प्रयोगशाळेची स्थापना
आजूबाजूच्या शाळांतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या वैज्ञानिक प्रयोगांसाठी अद्ययावत प्रयोगशाळांची स्थापना या केंद्रात होत आहे. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनात रोबोटिक्सपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत विविध अभ्यासक्रमही या केंद्रात सुरू होणार आहे. याचा फायदा समाजातील वंचित घटकांना तर होईल, त्याचबरोबर परिसरातील शाळा, महाविद्यालयांनाही मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com