
आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्या !
मला असे मनोमन वाटते की, कुटुंब व्यवस्था प्रेमावर आणि विश्वासावर आधारित असते; पण त्यासोबत त्याला आर्थिक जोड असेल तर, कुटुंबात एक प्रकारे स्थिरता येते. माझी आई आणि बाबा दोघे माझ्या खूप जवळचे व्यक्ती आहेत. आई खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्या सोबत मी सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्ट शेअर करते. तिला माझे सगळी गुपितं माहिती असतात. एक गुण जो मला आईचा आवडतो आणि मी पण तो अमलात आणते तो म्हणजे सगळ्या गोष्टी खूप सफाईदारपणे व्यवस्थित सांभाळणे. बाबांचा एक गुण मी आवर्जून सांगेल की, ते जास्त विचार नाही करत. लगेच कृती करतात, मग त्याचे परिणाम नंतर कसेही असू देत.
मला आठवते की, कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा मुंबईला येऊन इंडस्ट्रीमध्ये काम शोधायचे होते, तेव्हा काहीच कळत नव्हते की आता कुठे जाऊ, पण तेव्हा माझ्या कुटुंबाने धीर दिला आणि साथ दिली.
इतर कुटुंबांसारखेच माझे कुटुंब पण खूप घट्ट आहे. एक-दुसऱ्यांना आम्ही सांभाळतो आणि समजून घेतो. कोणी कोणाच्या आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही. पण जेव्हा गरज असेल, तेव्हा खंबीरपणे पाठिंबा देतो.
आम्ही आता खूप दिवसांनी एकत्र येणार आहोत. आई आणि बाबा दोघे अमृतसरला राहतात, माझा भाऊ मुंबईला राहतो. मी
सध्या ‘एण्ड टीव्ही’वरील ‘दुसरी माँ’ या मालिकेत ‘महुआ’ची भूमिका साकारत आहे. त्यामुळे
चित्रीकरणाच्या निमित्ताने मी जयपूरला राहते. पण जेव्हा आम्ही एकत्र येतो, तेव्हा मज्जा-मस्ती करतो आणि भांडतो, खूप वेळ एकत्र घालवतो.
कोरोनाच्या काळात मी आई-बाबांना सोबत घरी होते, तेव्हा बाहेर खूप बिकट परिस्थिती होती की, मला असे वाटायचे मी खूप खूप सुरक्षित आहे. तेव्हा असे लक्षात आले की, कुटुंब किती महत्त्वाचे असते. आपण खूप वाईट परिस्थितीत एक दुसऱ्याची काळजी घेतो.
नातेसंबंध चांगले होण्यासाठी मला असे वाटते की, जेव्हा आपल्यासोबत वादविवाद होतात, तेव्हा ते होऊ द्यात आणि नंतर सॉरी बोलण्याची हिम्मत पण ठेवा. आपल्या अहंकारापेक्षा आपले कुटुंब महत्त्वाचे आहे आणि किती राग आला तरीही तो राग शांत करून तो वादविवाद मिटविण्याची क्षमता ठेवावी.
नाती दृढ होण्यासाठी....
१) कुटुंबात एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. कुटुंबाने आपल्या बाबतीत काही विचार केला तर त्या गोष्टीवर विश्वास आणि समजून घ्यावे.
२) एकमेकांना आनंद व दुःखात नेहमीच साथ द्यावी.
३) नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे.
४) नात्यांमध्ये बोलण्यात वागण्यात संयमीपणा आणि आदर असावा.
५) आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा. त्यामुळे आपण खूप जवळ येतो.
(शब्दांकन ः अरुण सुर्वे)