
श्रेयांक आराखड्यावर शिक्कामोर्तब
पुणे, ता. २३ ः नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या सुकाणू समितीने श्रेयांक आणि अभ्यासक्रम आराखडा निश्चित केला होता. आता या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून अर्थातच २०२३-२४ पासूनच त्यांची अंमलबजावणी होईल.
कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी हा सुधारित अभ्यासक्रम आराखडा व श्रेयांक पद्धत असणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांशी निगडीत एआयसीटीई, पीसीआय, बीसीआय, सीओए एनसीटीई या नियामक संस्थांची मान्यता आवश्यक असलेले अभ्यासक्रम वगळून या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुकाणू समितीने सादर केलेल्या अंतरिम अहवालावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १९ व २० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये या अहवालावर सर्वांगाने चर्चा करण्यात आली.
अहवालाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्याची राज्यामध्ये एकसमान प्रमाणात अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे आणि सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले, या बाबतचा अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे गुरूवारी प्रसिद्ध झाला.
अंमलबजावणीमुळे होणारे बदल
- विद्यार्थ्याला एका शाखेतून दुसऱ्या शाखेत जाण्याची लवचिकता
- विद्यार्थ्यांना आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याची संधी
- विद्यार्थ्यांना मल्टिपल एन्ट्री अणि मल्टिपल एक्झिटची संधी
- क्रेडिटनुसार पदवी प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र किंवा तीन वर्षाची पदवी दिली जाणार
- अंतरविद्याशाखेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आवडीचे विषय शिकण्याची संधी