
शहरी गरीब योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी
पुणे, ता. २५ : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘शहरी गरीब योजने’च्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, प्रत्यक्ष कार्ड देताना पुन्हा कागदपत्रे तपासली जात असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलने केली आहे.
अर्बन सेलच्या नितीन कदम यांनी यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र बिनवडे यांना निवेदन दिले आहे. नोंदणी करताना नागरिक शिधापत्रिका, आधार कार्ड, उत्पन्न दाखला आदी कागदपत्रे ऑनलाइन जमा करून घेतली जातात. तरीदेखील नागरिकांना पुन्हा महापालिकेत बोलावून सदर कागदपत्रे तपासून कार्ड दिले जाते. एकदा कागदपत्र जमा केल्यानंतर पुन्हा ती तपासण्याची आवश्यकता काय. या तपासणीत नाहक वेळ जाऊन तासनतास ज्येष्ठ नागरिक, महिलांना रांगेत उभे राहावे लागत आहे. शहरी गरीब योजना कार्यालयातील संगणक, प्रिंटर आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, हे कार्यालय शनिवारी व रविवारीदेखील सुरू ठेवावे, उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, हृदयरोग, मेंदू संबंधित रोग, किडनी संबंधित रोग यावरील वाढते खर्च पाहता, यापोटी देण्यात येणारी रक्कम वाढवावी अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.