
‘भूमिअभिलेख’कडे ९५ कोटींचा महसूल जमा
पुणे, ता. २५ : गेल्या वर्षभरात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील मोजणी, सनदा, प्रॉपर्टी कार्डांच्या नकला यातून ९५ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल भूमिअभिलेख विभागाला मिळाला आहे. एकूण उद्दिष्टापैकी १३ कोटी ६२ लाख रुपयांची अधिक कमाई झाल्याने ११६ टक्के महसूल भूमिअभिलेख विभागाला मिळाला आहे.
‘‘पुणे भूमापन विभागाकडे ३१ मार्च २०२२ पूर्वी ४८ हजार ६७० मोजणींची प्रकरणे शिल्लक होती. पुढील वर्षभरात ६८ हजार ६०३ मोजणीची प्रकरणे नव्याने आली. त्यामुळे एक लाख १७ हजार २७३ मोजणी प्रकरणांपैकी ८१ हजार ३६७ मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. परिणामी, ३५ हजार ९०६ मोजणी प्रकरणे अद्याप शिल्लक आहेत. सहा महिन्यांतील मोजणीची प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते,’’ अशी माहिती भूमिअभिलेख विभागाच्या पुणे विभागाचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली.
गेल्यावर्षी विभागाला ८१ कोटी ९० लाख रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. त्यात १३ कोटी ६२ लाख रुपयांची वाढ होऊन ९५ कोटींहून अधिक रकमेची कमाई झाली आहे. एकूण उद्दिष्टापेक्षा ११६.६३ टक्के महसूल उत्पन्न वसूल झाला आहे, असेही ते म्हणाले.