
पर्यावरण रक्षणासाठी दीर्घकाळ काम करावे लागणार सयाजी शिंदे : प्रशासनाबरोबर समन्वयातून मार्ग काढण्याचा दिला सल्ला
पुणे, ता. २६ : ‘‘नदीकाठ सुधार योजनेत झाडे काढण्यात येणार आहेत. शासनाने या संदर्भात निर्णय घेतला असून, या संदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनही झाडे वाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलकांनी विचलित होऊन चालणार नाही. आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी दीर्घकाळ काम करावे लागणार आहे. प्रशासनाबरोबर समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे,’’ असा सल्ला वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी दिला.
पुणे महापालिकेच्या वतीने जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रुंदीकरणाच्या कामात येणारी खडकी येथील ६५ जुनी झाडे काढून रस्त्याच्या कडेला त्यांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे. यामध्ये वडाच्या २२ झाडांचा समावेश आहे. खडकी येथील या ठिकाणी त्यांनी भेट दिली. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दीनकर गोजारे, उपअभियंता विनोद मुरमुरे, वृक्ष प्राधिकरणचे सदस्य संदीप काळे आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.
नदीकाठ सुधार योजनेसंदर्भात ते म्हणाले, ‘‘या योजनेचे काम करण्यापूर्वी जायका प्रकल्प पूर्ण करून नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. नदी परिसरातील जीवसृष्टीची परिसंस्था टिकली पाहिजे. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी देखील बोलणे झाले आहे. विकास आणि निसर्ग संवर्धन या दोन्हींवर एकत्रित काम करण्याची गरज आहे. यासाठी नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक वाढवावा लागणार आहे.’’
वृक्षतोड झाली की वाळवंट होण्याची सुरुवात होते, हे आपण राजस्थानमध्ये पाहिले आहे, असे सांगून नेमाडे म्हणाले, ‘‘पूर्वी तेथे खूप झाडे होती. परंतु महापालिका झाडांचे पुनर्रोपण करून त्यांची जोपासना करत आहे, हे कौतुकास्पद आहे. किमान पुढील हजार वर्षे पुण्याची आपली संस्कृती टिकून राहील असा यामुळे विश्वास वाटतो.’’
...म्हणून मी माळरानावरच मेहनत घेतो
पुणे महापालिकेकडून या योजनेत ६५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत, त्यामध्ये आपल्या संस्थेचे काय योगदान असेल याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, ‘‘शहरांमध्ये वृक्ष संगोपनाबाबत अधिक बोलले जाते. परंतु नागरिकांकडून म्हणावे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे मी माळरानावरच वृक्ष संगोपनाच्या दृष्टीने अधिक मेहनत घेतो.