प्रलंबित भाडेकरार अखेर मार्गी

प्रलंबित भाडेकरार अखेर मार्गी

पुणे, ता. २७ : सर्व्हर आणि कनेक्टिव्हिटीच्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यात ऑनलाइन भाडेकरारांचे (लिव्ह ॲण्ड लायसन्स) तब्बल ३६ हजार दस्त नोंदणीसाठी प्रलंबित होते. त्यापैकी २५ हजार दस्तांची नोंदणी झाली असून उर्वरित दस्त चार दिवसांत नोंदविण्यात येणार येतील, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी दिली.
नोकरी, शिक्षणानिमित्त पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना रहिवास पुरावा, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी, गॅस नोंदणी, पारपत्र, विवाह नोंदणी अशा विविध कारणांसाठी ऑनलाइन भाडेकरार ग्राह्य धरण्यात येतो. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज भरण्यापूर्वीचा किंवा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी भाडेकरार नोंदणीकृत असणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. १०० आणि ५०० रुपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार आता कालबाह्य झाला असून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील ऑनलाइन भाडेकराराला आता कायदेशीर म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ऑनलाइन भाडेकरार करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
याबाबत नोंदणी निरीक्षक सोनवणे म्हणाले, ‘‘पुण्यासह राज्यातील ऑनलाइन भाडेकराराचे दस्त मोठ्या प्रमाणात प्रलंबित होते. त्यापैकी सध्या केवळ ११ हजार दस्तांची नोंदणी करणे बाकी आहे. ही नोंदणी पुढील चार दिवसांत मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागाच्या सर्व्हर आणि कनेक्टिव्हिटीच्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com