महिलांनी टाकलं ‘पुढचं पाऊल’

महिलांनी टाकलं ‘पुढचं पाऊल’

पुणे, ता. ३० : एखाद्या ‘स्त्री’साठी आजही घराबाहेर पहिलं पाऊल टाकणं किती आव्हानात्मक असतं, याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी गप्पांमधून केलेला उलगडा... प्रतिकूल परिस्थितीवर खंबीरपणे मात करत यशोशिखर गाठलेल्या तनिष्का सदस्यांचा कौतुक सोहळा... अन्‌ राजकारण, शिक्षण, सोशल मीडिया आणि कायदा क्षेत्रातील महिलांनी साधलेला मनमोकळा संवाद.... अशा अनुभवसंपन्न कार्यक्रमातून शेकडो महिलांनी ‘सकाळ’सोबत ‘पुढचं पाऊल’ टाकलं.
निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि कॅनेस्टेन यांच्या वतीने आयोजित ‘सकाळ’ पुढचं पाऊल कार्यक्रमाचे. या वेळी चाकणकर आणि कुलकर्णी यांच्याशी साधलेल्या संवादातून कुटुंब आणि करिअर यातील समतोल साधताना आलेले अनुभव आणि जीवनप्रवास उत्तरोत्तर उलगडत गेला. नामांकित युट्यूबर ऐश्वर्या पाटेकर, भारतीय जनता पक्षाच्या युवती मोर्चा अध्यक्षा डॉ. निवेदिता एकबोटे आणि ॲड. सुनीता जंगम यांनी आपापल्या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयांवर दिलखुलास संवाद साधला. याप्रसंगी ‘त्वचेचे संवर्धन आणि आरोग्य’ या विषयावर त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अनिल पत्की यांनी मार्गदर्शन केले तर चैताली माजगावकर-भंडारी यांनी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि भरघोस बक्षीसे जिंकली.
या कार्यक्रमात ‘कॅनेस्टेन पावडर’चे फ्री सॅंपल महिलांना देण्यात आले. ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे मुख्य बातमीदार मंगेश कोळपकर यांनी प्रास्ताविक केले तर शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

‘तनिष्का’ सदस्यांचा सत्कार
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना खंबीरपणे सामोरे जात यशाच्या मार्गावर जाणाऱ्या कर्तृत्ववान तनिष्का सदस्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. यात शीतल कुंभार, पूनम जाधव, मीनाक्षी सोनकटाळे, माया येवले, पद्मा कांबळे, दीपाली निखळ आणि स्वाती डिंबळे यांचा सत्कार करण्यात आला.

‘स्त्री’च्या भावविश्वातील पैलूंचा उलगडा
‘ती’चा गर्भात असल्यापासून सुरू होणारा संघर्ष... घराबाहेर पाऊल टाकताना उभी टाकलेली आव्हान... कुटुंब आणि करिअर सांभाळताना होणारी भावनिक ओढाताण आणि येणारी आव्हान... पालकत्व आल्यानंतर होणारे बदल आणि तरीही मोठ्या आत्मविश्वासाने ‘ती’चे पुढे पडणारे पाऊल, अशा ‘स्त्री’च्या भावविश्वातील अनेक पैलू रूपाली चाकणकर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या संवादातून उलगडत गेले.

टिकलीवरून कर्तृत्व पाहू नका
‘‘समाज राजकारणी व्यक्तींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो. परंतु राजकारण करताना समाजकार्य केले, तर लोकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. महिलांना आरक्षण दिले, परंतु कोणाचीतरी बायको, बहिण, मुलगी म्हणून त्या निवडणूक लढवितात. आजही टिकलीवरून आमचे कर्तृत्व पाहिले जाते. परंतु नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या महिला टिकली लावत नाहीत, हे आम्ही विसरतो. ‘ती’ म्हटलं की जन्मापासून नव्हे; तर गर्भात असल्यापासून संघर्षास सुरवात होते. महाराष्ट्रातील वाढणारे हुंडाबळी, बालविवाह, माता-बालक मृत्यू दर हे चित्र विदारक आहे. हे चित्र बदलण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ही लढाई ‘स्त्री’च्या अस्तित्वाची आहे’’ असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.


महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे
‘‘व्यवसाय, आवड, नोकरी करण्यासाठी घरातून बाहेर पहिले पाऊल टाकणे, हे प्रत्येक ‘स्त्री’साठी आव्हान असते. आपल्या क्षेत्रात पुढे जायचे असल्यास येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना स्वीकारून त्याला सामोरे जायला हवे. महिलांनी एकमेकींच्या दिसण्याकडे लक्ष देण्यापेक्षा एकमेकींच्या कामाविषयी चर्चा करायला हवी. वय कोणतेही असले, तरीही तुम्ही काहीही करू शकता, हे लक्षात ठेवायला हवे. घर, मुलं आणि करिअरचे संतुलन राखताना अनेकदा महिला तडजोड करतात, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. स्त्रियांनी आत्मविश्वासाने, धैर्याने पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याचा मनस्वी प्रयत्न करायला हवेत’’, असे मत मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


गोरेपणासाठीचे उपचार घातक
‘‘त्वचेच्या बुरशीजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून गेल्या काही वर्षात महिलांमध्ये हे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. फॅशन, महागडी सौंदर्य प्रसाधनांमुळे त्वचेच्या विकारात वाढ झाल्याचे दिसून येते. महिलांकडून गोरेपणाचा हट्ट धरला जातो. त्वचेला गोरेपण मिळावे, यासाठी उपचार घेतले जातात. परंतु, हे उपचार नैसर्गिकदृष्ट्या योग्य नसून अत्यंत घातक आहेत. ‘गोरे म्हणजे सुंदर’ ही कल्पना मनातून काढायला हवी. कातडीचा रंग आनुवंशिक असतो. ‘टॅनिंग’ होणे हे निसर्गाचे त्वचा संरक्षण देणे आहे. कोणत्याही औषधाने त्वचेचा रंग बदलता येत नाही, हे समजून घ्यायला हवे,’’ असे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अनिल पत्की यांनी सांगितले.

शिक्षण आणि राजकारणाची सांगड घालताना शिक्षणातील प्रगल्भता धोरण करताना उपयुक्त ठरते. भारत हा २०३५ पर्यंत सर्वाधिक तरुणांचा देश असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणात यायला हवे. कोणतीही गुणपत्रिका किंवा कागद तुमचे आयुष्य ठरवू शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
- डॉ. निवेदिता एकबोटे,
अध्यक्षा, भारतीय जनता युवा मोर्चा, युवती आघाडी, पुणे

यु-ट्यूब चॅनल सुरू करण्याचा प्रवास हा सहज कधीच नसतो. ‘यु-ट्यूब चॅनल’ का सुरू करतोय, हे ठरविणे म्हणजेच एक मोठा संघर्ष असतो. मराठीतून इंग्रजी शिकविण्याचा प्रयत्न यु-ट्युबद्वारे करत आहे. सोशल मीडियावर योग्य आणि व्यवस्थित आशय टाकून प्रेक्षकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
- ऐश्वर्या पाटेकर, युट्यूबर

आजच्या महिलांमध्ये बऱ्यापैकी कायदेविषयक ज्ञान असल्याचे दिसून येते. तरीही आर्थिक साक्षरता, कायद्याने दिलेले हक्क आणि अधिकार, गुंतवणुकीबाबत महिलांना जागरूक करणे आवश्यक आहे. वकिली व्यवसायात येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असून त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.
- ॲड. सुनीता जंगम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com