चांदणी चौकातील कामासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौकातील कामासाठी 
आणखी दीड महिन्यांचा कालावधी
चांदणी चौकातील कामासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी

चांदणी चौकातील कामासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी

sakal_logo
By

पुणे, ता. २ : चांदणी चौकात नव्या उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू आहे. तसेच पर्यायी बाह्य वळण रस्ते तयार करण्याचे काम देखील सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम एक मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर कदम म्हणाले, ‘‘मुंबई-बंगलूर महामार्गादरम्यान एनडीए चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एनएचएआयकडून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे खांब उभारण्यात आले असले, तरी नियोजनाप्रमाणे लागणारे सिमेंट काँक्रिटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. तसेच हे गर्डर टाकण्यासाठी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागणार आहे. त्याशिवाय गर्डर टाकण्याचे कामे करणे शक्य होणार नाही.’

सद्यःस्थितीला चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि तेथील रस्त्यांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ गर्डर आणि पर्यायी रस्त्यांच्या नियोजनाबाबतची कामे शिल्लक आहे. गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात दोन-दोन तासांचा बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांसोबतही पर्यायांची चाचपणी करून नियोजन करण्यात येत आहे. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे, असे कदम यांनी सांगितले. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास आणखी दीड महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे.