
आळंदी येथे दृष्टिहीनांचे ज्ञानेश्वरी पारायण
पुणे, ता. २ ः समाज जागृती व्हावी व तत्कालीन बाराव्या शतकातील मराठी भाषा दृष्टिहीनांना कळावी या हेतूने व त्यांना अध्यात्माचे ज्ञान मिळावे म्हणून प्रथमच तीन दिवसांचे ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले आहे. दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने देवाची आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराजवळ हे पारायण आयोजित केले आहे.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई, आमदार रवींद्र धंगेकर, संस्थानचे विश्वस्त ॲड. ढगे, डाॅ. शाळिग्राम भंडारी मान्यवरांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ५) रोजी होणार आहे. पारायणामध्ये संबंध महाराष्ट्रातून शंभराहून अधिक दृष्टिहीन बांधव सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात पारायणात सहभागी झालेल्या सहभागींना पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथ नाममात्र दरात वितरित करण्यात येणार आहे. तसेच सहभागी दृष्टिहीन बांधवांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने केलेली आहे.
आगळ्यावेगळ्या पारायणाला आळंदी परिसरातील नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी व ऐनवेळेस दृष्टिहीन मित्रांना या पारायणात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी देखील आपली नावे कार्यालयात 988183996 या भ्रमणध्वनीवर द्यावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर व आळंदी देवस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्यावतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.