‘शॉर्ट टर्म’मधून नोकरीची संधी

‘शॉर्ट टर्म’मधून नोकरीची संधी

पुणे, ता. ४ ः पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थी आता ‘शॉर्ट टर्म’ व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही पसंती देत आहेत. कौशल्याधारित आणि रोजगाराभिमूखतेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध ‘शॉर्ट टर्म’ अभ्यासक्रम सुरू केले असून, त्याचा थेट फायदा पदवीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. ज्यामुळे शिक्षणानंतर लवकर नोकरी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

विद्यापीठातील विविध विभागांनी पदव्युत्तर पदविका सुरू केल्या असून एक स्वतंत्र ‘डिग्री प्लस’नावाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना कमी कालावधीत नवीन आणि उपयुक्त ज्ञान मिळू शकते. या माध्यमातून प्लेसमेंटही लवकर झाल्यास विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागतो. विशेष म्हणजे आंतरविद्याशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या अभ्यासक्रमांना कोणत्याही पदवीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच तुलनेने बाहेरील अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क कमी असते.

तंत्रज्ञान विभागातील अभ्यासक्रम ः
उद्योगांतील भविष्यकालीन बदलांचा आढावा घेत नवीन पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केल्याचे तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ सुमेध रामटेके यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माहिती तंत्रज्ञानबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड असलेले सहा अभ्यासक्रम विभागात सुरू करण्यात आले आहे. ज्यामध्ये ४२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, बहुतेकांना प्लेसमेंट मिळते.’’ विद्यापीठाकडून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायन्स’, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इलेक्ट्रिक मोबिलिटी’, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्री ४.० बेस मॅकेटॉनिक्स ॲण्ड रोबोटिक्स’, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट’, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन थर्माको व्हिजिलन्स’ आणि बीएससी इन डेटा सायन्स अशा विषयांचा समावेश आहे.

डिग्री प्लस ः
कोरोनाकाळात विद्यापीठाकडून डिग्री प्लस हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. ज्यामध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रकारातील शॉर्ट टर्म अभ्यासक्रम असून, पदवीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याबरोबरच नोकरदारांसाठीही हे अभ्यासक्रम उपयोगी ठरत आहे. हार्वर्ड बिजनेस स्कूल, एडब्ल्यूएस अकॅडमी, हॅरिस स्कूल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आदी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे ऑनलाइन अभ्यासक्रम यात उपलब्ध आहेत. यासंबंधित माहिती https://degreeplus.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

शैक्षणिक संस्था आणि उद्योगांतील दरी कमी करण्याचा प्रयत्न डिग्री प्लसच्या माध्यमातून होत आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांबरोबरच नोकरदारांनाही नवे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो. विविध शॉर्ट टर्म कोर्सेस यावर उपलब्ध केले आहेत.
- डॉ. संजय ढोले, संचालक, नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र

नियमित अभ्यासक्रमांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारे शॉर्ट टर्म अभ्यासक्रम ‘डिग्री प्लस’ प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध केले आहे. पदवी अभ्यासक्रमांमध्ये रोजगाराभिमूख मुल्यवर्धनासाठी हे निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनीही असे कौशल्याधारित शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांना प्राधान्य द्यावे.
- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com