‘कँटोन्मेंट’मुळे वाढणार पुणे शहराची हद्द

‘कँटोन्मेंट’मुळे वाढणार पुणे शहराची हद्द

पुणे, ता. ४ ः केंद्र सरकारकडून लष्करी छावण्यांमधील (कँटोन्मेंट) निवासी भाग तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीन करण्याच्या निर्णयाची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुणे शहरातील पुणे आणि खडकी कँटोन्मेंटचा भाग पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यास शहराची हद्द १.६५ चौरस किलोमीटरने वाढणार आहे. पण त्याचसोबत या भागाचा सुनियोजित विकास होऊन पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्याची संधी आहे.
पुणे आणि खडकी कँटोन्मेंटची स्थापना १८१७ मध्ये झाली आहे. केंद्र सरकारने हिमाचलप्रदेशमधील कांगरा जिल्ह्यातील योल कँटोन्मेंट बोर्ड बरखास्त केला आहे. तेथील लष्करी आस्थापना वगळता नागरी वस्त्यांचा भाग हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीन केला आहे. त्याच धर्तीवर पुणे, खडकी व देहू रोड कँटोन्मेंट बोर्ड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीन करण्याचा आदेश कधी येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेकडून मागविला अभिप्राय
पुणे शहरात पुणे कँटोन्मेंट बोर्ड आणि खडकी कँटोन्मेंट असे दोन बोर्ड आहेत. हे दोन्ही बोर्ड महापालिकेत विलीन करण्याबाबत राज्य शासनाने महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. महापालिकेने अद्याप अभिप्राय सादर केलेला नाही. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे कँटोन्मेंटमध्ये २४६ एकर निवासी भाग आहे, तर खडकीमध्ये १६२ एकर निवासी भाग आहे. हे दोन्ही बोर्ड महापालिकेत समाविष्ट झाल्यास एकूण १६५ हेक्टरने म्हणजेच १.६५ चौरस किलोमीटरने क्षेत्रफळ वाढणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ ५२० चौरस किलोमीटर इतके होईल.

थकबाकीचे काय?
पुणे आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डच्या हद्दीमध्ये पुणे महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. तेथे देखभाल दुरुस्तीची कामेही महापालिका करते. या दोन्ही बोर्डांची मिळून सुमारे ७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. ती मिळविण्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे. जर दोन्ही बोर्ड महापालिकेत आले तर या थकबाकीचे काय होणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

याबाबत स्पष्टता येणे आवश्‍यक
- लष्कराचा भागा आला तरी तेथे बांधकाम करण्यासाठी कोणती नियमावली लागू होणार
- विकास आराखडा तयार केला तरी एफएसआय किती द्यायचा
- लष्करी आस्थापनांच्या सीमेपासून ५० मीटरच्या आत बांधकाम बंदीचा नियम कायम राहणार का
- कँटोन्मेंटमधील जमिनींवर लष्कराऐवजी महापालिकेचे नाव लागणार का

महापालिकेत विलीन होण्याचे फायदे
- महापालिकेत विलीन झाल्यावर नागरिकांना पायाभूत सुविधा मिळणार
- राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या योजनांचा लाभ मिळणार
- लष्करी क्षेत्रातील निर्बंधांपासून मुक्तता
- विकासकामांना गती मिळणार

राज्य सरकारने पुणे व खडकी कँटोन्मेंटच्या विलीनीकरणासंदर्भात महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. त्यास उत्तर देण्याची कार्यवाही सुरू आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त

लष्कराच्या शिस्तीमुळे कँटोन्मेंटचा भाग स्वच्छ, सुंदर आहे. हा भाग आल्याने महापालिकेवरील बोजा वाढणार असला तरी पुणे शहरात दोन महापालिका होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास नागरिकांच्या व प्रशासनाच्या दृष्टीने सोईचे होईल. पुणे महापालिकेची विभागणी झाली तरी त्या दोन्ही महापालिकांचा दर्जा समान राखण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत, ते त्याबाबत निर्णय घेऊ शकतील.
- महेश झगडे, सेवानिवृत्ती सनदी अधिकारी

कँटोन्मेंट परिसर निसर्गसंपन्न आहे. महापालिकेत याचे विलीनीकरण झाले, तर येथेही इमारतींचे जंगल उभे राहू शकते. इतकेच नाही तर करदेखील वाढेल; मात्र सुविधा, विकासकामांचा जोर वाढेल.
- चंद्रकांत खुणेकरी, रहिवासी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com