
‘नीट यूजी’चे प्रवेशपत्र उपलब्ध
पुणे, ता. ः वैद्यकीय प्रवेशासाठीच्या पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र अखेर नीट यूजीकडून उपलब्ध झाले आहे. रविवारी (ता. ७) होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. याव्यतिरिक्त उमंग आणि डिजिलॉकर या अतिरिक्त प्लॅटफॉर्मवरूनदेखील डाउनलोड करता येऊ शकते.
‘एनटीए’ने विद्यार्थ्यांसाठी मदत क्रमांक जारी केला आहे. संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास neet@nta.ac.in वर सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत ईमेल पाठवा, असे ‘एनटीए’च्या वतीने सांगण्यात आले आहे. या वर्षी तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. नीटची परीक्षा रविवारी दुपारी २ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमधून होणार आहे. परीक्षा ऑफलाइन (पेन आणि पेपर-आधारित) होणार आहे. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान या विषयांवरील १८० बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. हे प्रश्न ११ वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.
प्रवेशपत्रासाठी अधिकृत संकेतस्थळ : neet.nta.nic.in