पुण्यात प्रथमच ‘स्वॅप लिव्हर ट्रान्‍सप्लांट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात प्रथमच ‘स्वॅप लिव्हर ट्रान्‍सप्लांट’
पुण्यात प्रथमच ‘स्वॅप लिव्हर ट्रान्‍सप्लांट’

पुण्यात प्रथमच ‘स्वॅप लिव्हर ट्रान्‍सप्लांट’

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः यकृत खराब झालेल्या दोन रुग्णांना यशस्वी प्रत्यारोपनानंतर जीवनदान मिळाले आहे. लिव्हर सिरोसिसने ग्रस्त रुग्णांवर ‘स्वॅप यकृत प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया केली असून दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान अशा प्रकारची शस्त्रक्रिया पुण्यात प्रथमच केल्याचा दावा सह्याद्रि रूग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपिन विभूते यांनी केला आहे.
सह्याद्रि सुपरस्पेशालिटी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया केली. यात दोन यकृत दाते व दोन रुग्ण असे एकाच वेळी चौघांवर शस्त्रक्रिया केली. यासाठी ११ तज्ज्ञ डॉक्‍टरांसह २५ जणांचे पथक कार्यरत होते. यासाठी २० तासांचा कालावधी लागला. बुलडाणा येथील शिक्षक अजित रणावरे आणि नाशिकचे व्यावसायिक अमर शिंदे (रुग्णांची नावे बदललेली आहेत) हे दोन्ही रुग्ण यकृताच्या आजाराने त्रस्त होते. उपचारासाठी ते पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल झाले तेव्हा, त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर यकृत निकामी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी दोन्ही रुग्णांच्या पत्नींनी यकृत देण्याचे ठरविले. परंतु यात एकमेकांचे रक्तगट जुळत नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे डॉ. विभूते यांनी द्वि-मार्गी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला व त्यास दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. दोन्ही कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर अजित यांच्या पत्नी गीता यांचे यकृत अमर यांच्यावर तर अमर यांच्या पत्नी स्वरा (दोघींची नावे बदललेली आहेत) यांचे यकृत अजित यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपित करण्यात आले.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजित माने, डॉ. विकास चौधरी, डॉ. शरण नरूटे, डॉ. अनुराग श्रीमल, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर राहुल तांबे, अरुण अशोकन, अमन बेले, शर्मिला पाध्ये, अजिंक्य बोराटे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.


स्वॅप प्रत्यारोपण म्हणजे काय?
ज्या रुग्णांच्या कुटुंबात अवयव दात्यांचे रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण करण्यात अडचणी येतात, अशा रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हे आशेचा किरण ठरते. यामध्ये दोन रुग्ण ज्यांना एकाच प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाची आवश्‍यकता असते, अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते. यालाच स्वॅप प्रत्यारोपण असे म्हटले जाते. याला ‘पूल ट्रान्सप्लांट’ किंवा ‘पेअर एक्स्चेंज असेही म्हणतात. ज्या प्राप्तकर्त्यांचे नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत; पण रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत अशा प्राप्तकर्त्यांसाठी या प्रकारची देवाणघेवाण जीवनरक्षक सिद्ध झाली आहे.


यापूर्वी अशा प्रकारचे प्रत्यारोपण मुंबई व दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये झाले. परंतु अलीकडेच झालेले हे प्रत्यारोपण पुण्यातले अशा प्रकारचे पहिलेच आहे. अशा शस्त्रक्रियांपूर्वी रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते. भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूममध्ये करणे हे सर्वांत मोठे आव्हान होते.
- डॉ. बिपिन विभूते,
यकृत व बहू-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख


शस्त्रक्रियेबाबत

११
- तज्ज्ञ डॉक्‍टर

२५
- आरोग्य पथक

२० तास

- शस्त्रक्रियेसाठी वेळ