दुसऱ्‍याचं स्वातंत्र्य राखलं पाहिजे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्‍याचं स्वातंत्र्य राखलं पाहिजे !
दुसऱ्‍याचं स्वातंत्र्य राखलं पाहिजे !

दुसऱ्‍याचं स्वातंत्र्य राखलं पाहिजे !

sakal_logo
By

अभिनेत्री भाविका चौधरी

माझ्या मते, कुटुंब व्यवस्थेचा मुख्य आधार आहेत आपले आई-वडील. आपले आई-वडील आपल्यावर ज्या प्रकारे प्रेम करतात, तसं प्रेम जगात दुसरं कोणीही आपल्यावर करू शकत नाही. त्यांचं प्रेम हे पूर्णपणे नि:स्वार्थ आणि बिनशर्ती असतं. जीवनातील अन्य नातीही आपण निवडतो, पण आपले पालक ही परमेश्वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. आपण नेहमीच नवे मित्र, नवा जीवनसाथी निवडू शकतो, पण पालक कधी बदलता येत नाहीत. आपल्या आयुष्यातील त्यांची जागा दुसरे कोणीच घेऊ शकत नाहीत.
खरं सांगायचं तर मी माझ्या आई-वडील दोघांशीच खूप जवळची. पण मी माझ्या वडिलांशी अधिक जवळ होते. ते आता या जगात नाहीत. माझ्या वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळेच आज मी जी काही आहे, ते केवळ त्यांच्यामुळेच. मला चांगलं आठवतंय, अभिनय क्षेत्रातील माझे गुण आणि मी करत असलेले प्रयत्न पाहिल्यावर त्यांनी मला सांगितलं होतं, ‘मेरा बेटा एक दिन स्टार बनेगा!’ माझ्या पालकांनी जीवनात खूप कष्ट केले होते. माझे वडील जिवंत होते, तेव्हा ते मला नेहमी सांगायचे की आपल्या कामात आपलं सर्वस्व ओतून दिलं पाहिजे. मी त्यांच्याकडून तीच गोष्ट शिकले आहे, म्हणूनच मी माझ्या कामात माझं १०० टक्के योगदान देते.
आम्ही सर्व एकत्र आलो, की भरपूर गप्पा मारतो. आपली मतं मांडतो. आपण सध्या काय करत आहोत, ते एकमेकांना सांगतो. माझे बाबा हयात होते, तेव्हा ते कुवेतमध्ये राहात. माझा भाऊ कॅनडात राहतो आणि मी मुंबईत राहते. त्यामुळे आम्ही दिवाळी किंवा होळीसारख्या सणांसाठी डेहराडूनमध्ये एकत्र भेटत असू. आताही आम्ही आमच्या सुट्या आधीच एकत्र नियोजन करून आखतो. त्यामुळे आम्हाला डेहराडूनमध्ये एकत्र राहता येतं. तिथेच आमचा जन्म झाला आणि आम्ही मोठे झालो. आता आमचे बाबा हयात नसल्याने आम्ही आमच्या सुट्या नीट नियोजन करून आखतो, जेणेकरून आम्हाला आईबरोबर एकत्र राहायला मिळतं.
माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा मला माझ्या कुटुंबाचं महत्त्व पटलं. मी त्यांच्या फारच जवळ होते आणि मी त्यांना खूप मानत असे. पण म्हणतात ना, ‘एखादी व्यक्ती गेल्यावरच तुम्हाला तिचं महत्त्व कळतं,’ तसं माझं झालं. मला त्यांच्याबरोबर आणखी काही काळ व्यतीत करता आला असता, तर किती छान झालं असतं. चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे मला कधी-कधी त्यांच्या फोनला किंवा मेसेजना लगेच उत्तर देता येत नसे. मला तसं करता आलं असतं तर.
सध्या मी ‘झी टीव्ही’वरील ‘मैत्री’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे. आता जेव्हा माझी आई मला फोन करते, तेव्हा मी तिला ताबडतोब उत्तर देते. माझ्या वडिलांच्या मिस्ड कॉल्सना उत्तर देण्यासाठी मी आजही काय वाटेल ते करीन. पण आता मी माझ्या कुटुंबीयांच्या अधिकच जवळ आले आहे. मी माझ्या भावाला नियमितपणे फोन करते आणि माझ्या आईशी दिवसातून निदान दोनदा तरी बोलतेच. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला आता माझ्या कुटुंबीयांचं महत्त्व अधिकच जाणवत आहे.
माझ्या मते, प्रत्येक नातेसंबंधात संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते तुमचे मित्र असतील की कुटुंबीय. कारण, तुम्ही तुमच्या समस्येवर चर्चा केली नाही, तर त्यावर तुम्ही तोडगा कसा काढाल? किंबहुना मला असं वाटतं की, कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये मतभेद झाले, तर त्यांनी या समस्येवर चर्चा केली पाहिजे. त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास त्या नात्यात नवे प्रश्न आणि गैरसमज निर्माण होतात.

नाती दृढ करण्यासाठी....
१) पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक नातेसंबंधात संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. मग ते कौटुंबिक नातं असो की दुसरं कोणतंही नातं असो.
२) दुसरी गोष्ट, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दुसऱ्याच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत.
३)तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण दुसऱ्‍याचं स्वातंत्र्य राखलं पाहिजे. दुसऱ्यांना सल्ला देणं ठीक आहे, पण त्याने तो सल्ला मानलाच पाहिजे, यासाठी त्यावर दबाव टाकता कामा नये.
४) चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधावी आणि कुटुंबीयांमध्ये आनंद निर्माण करावा.
५) शेवटची गोष्ट म्हणजे, कोणतंही कौटुंबिक नातं घट्ट करण्यासाठी प्रेम, आपुलकी हेच सर्वात महत्त्वाचं असतं.
(शब्दांकन ः अरुण सुर्वे)