महापालिकेची शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेची शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी
महापालिकेची शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी

महापालिकेची शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुणे महापालिकेचे नवे आर्थिक वर्ष सुरू झाले तरी अद्याप दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम अनेक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे समाज विकास विभागाच्या विरोधात अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.

महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना राबविण्यात येते. यामध्ये दहावीसाठी १५ हजार तर आणि बारावीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, रात्रशाळेतील विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ८० ऐवजी ७० टक्केपेक्षा जास्त आणि ४० टक्के दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी, कचरा वेचकाची मुले, बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी, सर्व असंघटित कष्टकरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येतो.
दहावीच्या आठ हजार ३२२ तर बारावी उत्तीर्ण झालेल्या दोन हजार ६०७ असे एकूण १० हजार ९२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मार्च महिन्याच्या अखेरीस त्यापैकी तीन हजार २३५ जणांच्या बँक खात्यात पाच कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. तर पाच हजार ४३४ अर्जांचे आॅडिट सुरू असून एक हजार ९२६ अर्जांची छाननी सुरू होती. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पुढील दोन दिवसात पैसे जमा होतील, असा दावा समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. पण, अद्याप अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. समाज विकास विभागाकडे याची चौकशी केली असता पैसे जमा झाल्याचे सांगितले जाते. पण, प्रत्यक्षात बँक खात्यात पैसे जमा झालेले नसल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल होत आहेत. यासंदर्भात माजी नगरसेवक प्रशांत बधे, उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे तक्रार केली असून, यासंदर्भात सोमवारी (ता. ८) बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे.

‘त्वरित पैसे मिळावे’
बधे म्हणाले, ‘‘एक वर्ष उलटून गेले तरीही अनेक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. किती जणांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि किती जणांच्या नाही यावरून खात्यात गोंधळ आहे. जे विद्यार्थी वंचित आहेत, त्यांना त्वरित पैसे मिळाले पाहिजेत, अशी मागणी केली आहे.’’