रेल्वेची ‘स्पेशल’ खेळी; तिकिटांचे दर वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेची ‘स्पेशल’ खेळी; तिकिटांचे दर वाढले
रेल्वेची ‘स्पेशल’ खेळी; तिकिटांचे दर वाढले

रेल्वेची ‘स्पेशल’ खेळी; तिकिटांचे दर वाढले

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : पुण्याहून सुटणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांना वेटिंग सुरू आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना तर नो रूम असल्याने त्याचे वेटिंग तिकीटदेखील प्रवाशांना मिळत नाही. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने काही ठराविक मार्गावर ‘स्पेशल दर्जा’ असलेल्या रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सोय झाली असली तरीही तिकिटांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. तत्काळ तिकिटांच्या दरा इतकेच या स्पेशल गाड्यांचे तिकीट दर आहेत. त्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल रेल्वे प्रवास’ महागडा ठरतो आहे.
सध्या प्रवाशांचा गर्दीचा हंगाम सुरु आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही मार्गावर विशेष रेल्वे सुरु केल्या आहेत. पुण्याहून दानापूर, झेलम, जयपूर, नवी दिल्ली, हावडा आदी एक्सप्रेसला ‘नो रूम’ आहे. तर, मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना वेटिंग आहे. अशीच परिस्थिती अन्य मार्गावरच्या गाड्यांना आहे. सगळ्याच गाड्यांना प्रवाशांची गर्दी असल्याने स्पेशल रेल्वेला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडत आहे.

या मार्गावर स्पेशल गाड्या :
पुण्याहून कानपूर, नागपूर, झांसी, जबलपूर, गोरखपूर, पाटणा, सावंतवाडी, रत्नागिरी व अमरावती या शहरांसाठी स्पेशल दर्जाच्या रेल्वे सोडल्या आहेत. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वे प्रशासनाने या मार्गावर स्पेशल रेल्वे सोडल्या आहेत.

मराठवाडा व विदर्भाच्या गाड्यांना गर्दी :
पुण्याहून लातूर, नांदेड, कोल्हापूर, सोलापूरच्या गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. नांदेड एक्स्प्रेसच्या डब्यांत पाय ठेवण्यासाठी देखील जागा नाही. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. तेव्हा रेल्वे प्रशासनाने मराठवाडा व विदर्भासाठीदेखील गाड्या सोडणे गरजेचे होते. नागपूरला जाणाऱ्या गाड्यांनादेखील गर्दी आहे.

रेल्वेत कोणत्याही प्रकारची ‘स्पेशल’ सुविधा नसतानाही त्याला ‘स्पेशल’चा दर्जा दिला जातो. त्यामुळे तिकीट दरात प्रचंड वाढ होते. तेव्हा सामान्यांना परवडेल अशा एक्स्प्रेस गाड्या सोडणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य शहरांसाठी देखील गाड्या सुरु करणे गरजेचे आहे.
-आनंद सप्तर्षी, स्थानक सल्लागार समिती सदस्य, पुणे.

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्सप्रेससह पुणे-पंढरपूर डेमू गाड्या सुरू कराव्यात. पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्वच इंटरसिटीचे डबे वाढविणे गरजेचे आहे.
-पियुष संगापूरकर, प्रवासी