
महामेट्रोकडून उत्तर आल्यावर सीओईपी देणार अंतिम अहवाल
पुणे, ता. ५ ः मेट्रोच्या चार स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्राथमिक अहवालावर महामेट्रो येत्या दोन दिवसांत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (सीओईपी) स्पष्टीकरण देणार आहे. त्यानंतर ‘सीओईपी’कडून अंतिम अहवाल दिला जाणार आहे, अशी माहिती महामेट्रो आणि ‘सीओईपी’ यांनी संयुक्त पत्रकाद्वारे शुक्रवारी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीओईपी’ने मेट्रोच्या वनाज, आनंदनगर, नळस्टॉप आणि गरवारे कॉलेज स्थानकांची आणि मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा प्राथमिक अहवाल ३० एप्रिल रोजी महामेट्रोला सादर केला. त्यात आराखडा सुरक्षित असून ३०हून अधिक त्रुटी असल्याचे म्हटले होते. तसेच आराखड्याबाबत काही प्रश्न ‘सीओईपी’ने उपस्थित केले आहेत. त्रुटी दूर करण्याचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. त्याचा पूर्तता अहवाल आणि आराखड्याबाबतच्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण येत्या दोन दिवसांत सीओईपीला दिले जाईल, अशी माहिती महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
दरम्यान, महामेट्रोला दिलेला अहवाल प्राथमिक आहे. त्याच्यावर त्यांनी काय कार्यवाही केली, याची माहिती घेतली जाईल. तसेच काही मुद्द्यांवरून त्यांच्याकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे. ते आल्यावर खातरजमा करून अंतिम अहवाल दिला जाईल, असे ‘सीओईपी’ने शुक्रवारी स्पष्ट केले.
महामेट्रोच्या वनाज - गरवारे महाविद्यालय मार्गावरील चारही स्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी नागरिक नारायण कोचक आणि शिरीष खासबारदार यांनी एका जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देताना, स्ट्रक्चरल ऑडिट ‘सीओईपी’ने करावा, असा आदेश न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला आहे. दरम्यान सीओईपीने सादर केलेला प्राथमिक अहवाल नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी कोचक यांनी केली आहे.