लष्करी जवान असल्याचे भासवून फसवणूक टोळीला अटक; कारवाईत एकूण १० जणांना घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लष्करी जवान असल्याचे भासवून फसवणूक

टोळीला अटक; कारवाईत एकूण १० जणांना घेतले ताब्यात
लष्करी जवान असल्याचे भासवून फसवणूक टोळीला अटक; कारवाईत एकूण १० जणांना घेतले ताब्यात

लष्करी जवान असल्याचे भासवून फसवणूक टोळीला अटक; कारवाईत एकूण १० जणांना घेतले ताब्यात

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : लष्कराचा जवान असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार अटक केली आहे. या कारवाईत एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून ते ऑनलाइन पद्धतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

भारतीय सैन्यदलाच्या नावाखाली नागरिकांचे फसवणूक होत असल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाकडे आली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत संजीव कुमार (वय ३०) या कुख्यात सायबर चोरट्याला अटक केली होती. फसवणूक करणाऱ्या संजीव याला भरतपूर येथून अटक केली होती.

पुणे, हरियाना, उत्तर प्रदेश आणि, राजस्थान पोलिस व लष्कराच्या गुप्‍तचर विभाग हे संयुक्तपणे या गुन्ह्याची चौकशी करत होते. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मेवात, नूह आणि डीग परिसरात पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत आणखी नऊ सायबर गुन्हेगारांना अटक झाली. आरोपींमध्ये अनुभवी सायबर गुन्हेगारांचा समावेश होता. जे गेल्या काही वर्षांपासून अशा स्वरूपाचे गुन्हे करत आहेत. आरोपी नागरिकांना लष्करी जवान असल्याचे भासवीत त्यांचा विश्वास जिंकत होते. तसेच ऑनलाइन पद्धतीने भाडेतत्त्वावर घर घेणाऱ्या व्यक्ती आणि इतर संकेतस्थळांद्वारे नागरिकांची फसवणूक करत होते. या टोळीद्वारे ‘दीपक बजरंग पवार’ या नावाने तयार केलेल्या जवानाच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात येत होता.

आतापर्यंत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक
आरोपींकडून आतापर्यंत अनेक बनावट लष्करी ओळखपत्र, कॅन्टीन स्मार्ट कार्ड, पॅन व आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाईल, २०६ सिम कार्ड आणि ७ लॅपटॉप जप्त केले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये ही टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे. टोळीने आतापर्यंत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अशी केली फसवणूक
आरोपी मालमत्ता भाड्याने किंवा काही वस्तू खरेदी करण्याच्या व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी नागरिकांकडून काही शुल्क आकारत होते. या प्रक्रियेदरम्यान ते काही तांत्रिक समस्या निर्माण करत आणि नागरिकांकडून ओटीपी किंवा क्यूआर कोड शेअर करण्याची विनंती करून त्याद्वारे नागरिकांच्या खात्यातून पैसे काढत होते.

अटक टाळण्यासाठी लढवली ही युक्ती
अटक टाळण्यासाठी आरोपी उत्तर प्रदेश, हरियाना, दिल्ली आणि राजस्थानच्या ट्राय जंक्शनवरून ऑपरेट केलेल्या मॉड्यूलचा वापर करत होते. गुन्हेगारी कार्यक्षेत्रातील गुंतागुंत निर्माण करण्यासाठी ते एकाधिक सिम कार्ड आणि मोबाईल फोन आणि बँक खाती वापरत होते.