
अभियांत्रिकीची सीईटी मंगळवारी
पुणे, ता. ७ ः अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी राज्य स्तरावर घेतली जाणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात एमएचटी सीईटी मंगळवार (ता. ९) पासून सुरू होत आहे. सीईटी सेलच्या वतीने ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली असून, शनिवार (ता. १३) पर्यंत विविध टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे.
शुक्रवार (ता. ५) पासून अधिकृत संकेतस्थळावर पीसीएम ग्रुपची हॉल तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठी सर्वप्रथम mhtcet2023.mahacet.org या संकेतस्थळावर जात प्रवेशपत्राच्या पर्यायावर क्लीक करायचे आहे. तिथे दिलेली माहिती भरत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. सीईटीच्या पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या परीक्षा दोन सत्रांत होणार आहेत. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ या वेळांमध्ये परीक्षा होतील. पीसीबी ग्रुपच्या परीक्षा १५ मे ते २० मे दरम्यान होणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवसआधी या गटाचीची प्रवेशपत्र सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. दरम्यान, या वर्षी सीईटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. या वर्षी ४ लाख १४ हजार ९६८ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. यावर अभियांत्रिक, फार्मसी आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश अवलंबून आहेत.