
पुण्यातील तिकीट पर्यवेक्षकांना आता ‘बॉडी कॅमेरे’
पुणे, ता. ७ ः रेल्वे अथवा लोकलच्या प्रवासात तिकीट पर्यवेक्षकांशी वा अन्य प्रवाशांशी भांडण करणे आता महागात पडू शकते. कारण रेल्वे प्रशासनाने आता लोकल व एक्स्प्रेसच्या ‘एमएसटी’ डब्यांत तिकीट चेक करणाऱ्या पर्यवेक्षकांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाद घालणाऱ्या, भांडण करणाऱ्या प्रवाशांचे सहज चित्रीकरण होऊन कारवाई केली जाणार आहे. मुंबईत तिकीट पर्यवेक्षकांना ५० कॅमेरे दिले असून, त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तिकीट पर्यवेक्षकांनादेखील ‘बॉडी कॅमेरे’ दिले जाणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे कॅमेरे शर्टच्या कॉलरजवळ लावले जाईल.
गेल्या काही दिवसांत सिंहगड एक्स्प्रेससह लोकलमध्ये प्रवाशांत मारामारीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश वाद हे महिला डबा, एमएसटी (पासधारकांसाठी राखीव) असणाऱ्या डब्यांत जागेवर बसण्यावरून झाले आहेत. वाद झाल्यावर प्रवासी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. अशा वेळी कोणाची बाजू घ्यावी, असा प्रश्न पडतो. मात्र या असा प्रसंग उद्भवल्यावर झालेल्या चित्रीकरणाच्या आधारे सत्य समजू शकणार आहे. यासह रेल्वेत वा रेल्वे स्थानकावर एखादी घटना घडल्यास त्याचे सहज चित्रीकरण होऊ शकते.
असे आहेत ‘बॉडी कॅमेरे’
तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा फिक्सल असून ते सलग ३० तास कार्यरत राहण्याची क्षमता आहे. याचा वापर मुख्यत्वे करून लोकलमध्ये केला जाणार आहे. पुणे ते लोणावळा व शिवाजीनगर ते लोणावळादरम्यान रोज ४१ लोकलच्या फेऱ्या होतात. यासाठी वेगवेगळ्या सत्रात १६ तिकीट पर्यवेक्षक काम करतात. यापूर्वी आरपीएफ यांनादेखील अशाच प्रकारे बॉडी कॅमेरा देण्यात आले होते.