‘वेलनेस’साठी आयटी कंपन्यांचे एक पाऊल पुढे !

‘वेलनेस’साठी आयटी कंपन्यांचे एक पाऊल पुढे !

पुणे, ता. ८ ः माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सातत्याने सामोऱ्या जाणाऱ्या ताणतणावांवर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी नावीन्यपूर्ण उपाय शोधले आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांचे शारीरिकच नव्हे तर, मानसिक आरोग्यही राखले आहे. परिणामी, कंपन्यांची उत्पादनक्षमताही वाढत आहे. त्यासाठी कंपन्या मोठी आर्थिक तरतूद करू लागल्या आहेत.

कोरोनानंतरच्या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल आयटी कंपन्या जागरूक झाल्या आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी ‘वेलनेस’ प्रोग्रॉम तयार केले आहेत. त्यासाठी वार्षिक नियोजनात ‘वेलनेस बजेट’चा विचार होत असून त्यासाठीची तरतूद वाढती आहे.
कामाच्या विचित्र वेळा, ग्राहकांच्या सोयीनुसार करावी लागणारी ऑनलाइन उपलब्धता, या सगळ्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो. त्यावर उपाय म्हणून कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी, अद्ययावत जीम, झुंबाचे क्लास, ट्रेक आदी उपक्रम वाढविण्यास सुरवात केली आहे.
काही कंपन्यांत कामाच्या ठिकाणी आठवड्यातून २ ते ३ वेळेस ठराविक वेळेत योगासने, ध्यान- धारणाचे वर्ग सुरू झाले आहेत. आहार- विहार आणि व्यायामासाठी तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत तर, काही कंपन्यांमध्ये गिटार, पियानो, बासरी आदी वाद्यांच्या शिकवणी वर्गांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या उपक्रमांना आयटी कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही आयटी कंपन्या एकत्रितपणे मॅरेथॉनसारखे उपक्रम आयोजित करीत आहेत. तर काही कंपन्यांनी मॅरेथॉन, ट्रेकसाठी कर्मचाऱ्यांना ‘स्पॉन्सर’ करण्यास सुरवात केली आहे.

कामाच्या ठिकाणीही वेलनेस
कर्मचारी अनेक शिफ्टमध्ये काम करतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सहभागी होणे शक्य नसते. त्यामुळे कंपनीत कर्मचारी आला की, त्याच्या ‘वर्क स्टेशन’वर त्याला करता येतील, असे सोपे व्यायाम प्रकार त्यांच्यापर्यंत कंपन्या पोचवू लागल्या आहेत.

असा आहे वेलनेस कार्यक्रम
- कर्मचाऱ्यांसाठी पूर्णवेळ ‘समुपदेशन’ डेस्क
- आहार, विहार आणि निरोगी जीवनशैलीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
- चालणे, धावणे, ट्रेक, सायकलींग आदी उपक्रमांचे नियमित आयोजन
- नृत्य, झुंबा क्लास, संगीत वाद्यांचे शिकवणी वर्ग
- योगासने, ध्यान, प्राणायमांचे अभ्यासवर्ग
- कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी

वरिष्ठ पातळीवर काम करताना निरोगी जीवनशैलीसाठी कंपनीतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘वेलनेस प्रोग्रॉम आणि इतर ‘एम्प्लॉयी वेलबीईंग’साठी झालेल्या उपक्रमांचा खूप फायदा झाला. कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या ‘वेलनेस असिस्टंट प्लॅन’ अंतर्गत घरी व्यायामाचे साहित्य घेतले आणि त्यामुळे घरीच हलके व्यायाम करता येतात.
- पद्मिनी पिपाला, वरिष्ठ संचालक

कंपनीतील वेलनेसच्या उपक्रमामुळे मन प्रसन्न होते आणि ताणही कमी होतो. त्याचा फायदा काम करताना होतो आणि त्यातून उत्पादकता वाढते. हा केवळ माझाच नाही तर, अनेक सहकाऱ्यांचाही अनुभव आहे.
- राजेश कानडे, रिलीज मॅनेजर

कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘फोकसिंग ऑन यु’ या कार्यक्रमाने प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून आहार, व्यायाम आदींद्वारे स्वत:मध्ये सुधारणा करता आली.
- रेखा शेट्टी, आयटी डायरेक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com