
तांत्रिक पदवी अभ्यासक्रमांतर्गंत प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे, ता. ८ ः भारतीय सैन्यदलाच्या वतीने तांत्रिक पदवी अभ्यासक्रमांतर्गत (टीजीसी) प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १३८ व्या ‘टीजीसी’साठी असून केवळ पुरुष उमेदवारांना याद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतच्या सूचना सैन्यदलाने दिल्या आहेत.
सैन्यदलात अधिकारी म्हणून सेवा बजावण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी असून या प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए) येथे प्रवेश दिला जाणार आहे. अभियांत्रिकी पदवी असलेले किंवा अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षे ठेवली आहे. तसेच एकूण ४० जागा प्रवेशांतर्गत राखीव ठेवल्या आहेत.
प्रवेश प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींद्वारे (एसएसबी) उमेदवारांना निवडणार आहे. पदवीतील गुणवत्तेच्या आधारे एसएसबीसाठी उमेदवारांना बोलविण्यात येईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणीचा टप्पा पार पडेल. या प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढे आयएमएमध्ये ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाणार. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे उमेदवार सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखल होतील.
इच्छुक उमेदवारांना अर्ज येत्या १७ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
यासाठी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.