
उद्योगविश्व जवळून अनुभवायची तरुणांना संधी
पुणे, ता. ९ : उद्योगविश्वाच्या अभ्यासाबरोबरच हे क्षेत्र जवळून अनुभवायची संधी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) ने आपल्या युथ फेलोशिप प्रोग्रॅम २०२३ अंतर्गत उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत मराठा चेंबरच्या कार्यालयामध्ये काम करायची संधी तरुणांना मिळणार आहे.
कृषी आणि खाद्यप्रक्रिया, इलेक्ट्रॅानिक्स, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादने, इलेक्ट्रॅानिक्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, महिला उद्योजक, मनुष्यबळ विकास, शाश्वत विकास, आयात-निर्यात, अर्थव्यवस्था आणि औद्योगिक धोरणांविषयी संशोधन, वित्त पुरवठा, विविध कायदे, करविषयक समित्या आणि विशेष विभागांच्या कामात तरुणांना काम करता येणार आहे.
सुमारे दोन हजार ७०० कंपन्या आणि संस्था मराठा चेंबरच्या सदस्य आहेत. त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांमध्येही या तरुणांना सहभागी होता येईल. एमसीसीआयए युथ फेलोशिप प्रोग्रॅमचे हे चौथे वर्ष आहे. या योजनेत ज्यांची निवड होईल त्यांना चेंबरच्या उद्योगांसाठीच्या विविध स्वरूपाच्या कामातल्या अनुभवाव्यतिरिक्त ठराविक मोबदला दिला जाणार आहे, अशी माहिती चेंबरकडून देण्यात आली. फेलोशिपसाठी २० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी www.mcciapune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.