‘ती’ची अस्वस्थता पोलिस करणार कमी !

‘ती’ची अस्वस्थता पोलिस करणार कमी !

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ ः गर्दीच्या ठिकाणी विकृत मनोवृत्तीच्या काही घटकांकडून होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी तुळशीबाग, फर्ग्युसन रस्ता, हॉंगकॉंग लेन आदी ठिकाणी मंगळवारपासून साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करणार आहे, अशी घोषणा शहर पोलिसांनी केली आहे.
सुट्यांमुळे शहरात सध्या पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. तसेच तुळशीबाग, फर्ग्युसन रस्ता, हॉंगकॉंग लेन आदी ठिकाणी महिलांची गर्दी असते. त्या ठिकाणी विकृत मनोवृत्तीच्या काही व्यक्ती महिलांशी आक्षेपार्ह वर्तन करतात. चर्चा होईल, या भीतीने महिला तक्रार देत नाहीत. तुळशीबागेत सुमारे १५ दिवसांपूर्वी अशा एका व्यक्तीला परिसरातील काही दुकानदारांनी चोपही दिला होता. गर्दीच्या ठिकाणी महिलांची घुसमट होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत साध्या वेशातील पोलिसांची गर्दीच्या ठिकाणी नियुक्ती करण्याची घोषणा पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली. साध्या वेशातील पोलिस पथके तेथे मंगळवार सकाळपासून तैनात असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुळशीबाग, फर्ग्युसन रस्ता, हॉंगकॉंग लेन आदी गर्दीच्या ठिकाणी छेडछाड प्रतिबंधक पथक आणि दामिनी पथक मंगळवारपासून कार्यरत असेल. छेडछाड प्रतिबंधक पथकात एक अधिकारी, चार महिला- पुरुष कर्मचारी असतील. तर दामिनी पथकात दोन कर्मचारी महिला असतील. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांनाही सूचना दिल्या आहेत.
- संदीप कर्णिक, पोलिस सहआयुक्त

नागरिक म्हणतात.....
कादंबरी गाडगीळ ः मध्यवस्तीत अशा घटना घडणे हे चिंता करण्यासारखे आहे. माझ्या बाबतीत अशी घटना घडली होती. तो मुलगा आणि त्याच्या वयाच्या दुपटीहून मी मोठी होते. मला माझ्याशी गैरवर्तन केले. त्याचवेळी मी त्याच्या थोबाडीत मारले. त्याला आश्चर्य वाटले की, एक स्त्री इतक्या भयंकर प्रकारे कशी मारू शकते? पाठ आणि गाल चोळत तो भीतीने पळत सुटला. त्याचा मी पाठलाग करत होते. त्याला जरब बसवून मग मी परत फिरले. ‘धरा’ आणि ‘धोपटा’ हा एकच मार्ग अशा वेळी उपयोगी पडतो. म्हणून मुली आणि स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी प्रयत्न करायलाच हवेत.

ॲड. पुष्पा पाटील ः गर्दीच्या ठिकाणी महिलांना कोणी त्रास दिला तर, त्यांनी घाबरून जाऊ नये. दुकानदाराच्या मदतीने संबंधिताला जाहीरपणे दरडावे. तसेच नागरिकांनीही अशा महिलांना मदत करावी.

प्रभाकर ठुसे ः गर्दीच्या ठिकाणी महिलांना अस्वस्थ करणाऱ्या घटकांवर पोलिसांनी जबर कारवाई करायला पाहिजे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत. तसेच त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रांत प्रसिद्ध करायला हवीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com