कंटेनरवरून जॉब घसरून भर रस्त्यात पडल्याने वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनरवरून जॉब घसरून भर रस्त्यात पडल्याने वाहतूक कोंडी
कंटेनरवरून जॉब घसरून भर रस्त्यात पडल्याने वाहतूक कोंडी

कंटेनरवरून जॉब घसरून भर रस्त्यात पडल्याने वाहतूक कोंडी

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्थानकाजवळ सोमवारी पहाटे कंटेनरवरून अवजड जॉब घसरून भर रस्त्यात पडला. त्यामुळे या महामार्गावर खडकी, शिवाजीनगर आणि येरवड्यापर्यंत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.
मेट्रोच्या कंटेनरवरून २७ टनी जॉब (मोठा लोखंडी बॉक्स) घसरून भर रस्त्यात पडला. त्यामुळे सकाळपासूनच खडकी आणि पिंपरी चिंचवड येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी एका लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू केली. वाहतूक पोलिसांनी अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला केला. परंतु पुन्हा कंटेनर बाजूला काढण्यासाठी आलेले तीन क्रेनही रस्त्यावरच होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत खडकी बाजार येथून पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बाजूने शिवाजीनगर, संगम पूल, हॅरिस ब्रिज आणि येरवड्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, कंटेनरवरील जॉब २७ टनांचा असल्यामुळे वाहतूक पोलिसांना कंटेनर बाजूला करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. टाटा मेट्रोच्या हायड्रो क्रेनने कंटेनरवरून घसरलेला जॉब उचलला. दुसऱ्या क्रेनने बाजूला सरकावले. अखेर तिसऱ्या क्रेनने बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर कंटेनर बाजूला केला. त्यात सायंकाळी पाऊस पडल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह शिवाजीनगर, खडकी आणि येरवडा वाहतूक पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.