गुणगुणणे ः एक कला

गुणगुणणे ः एक कला

नमस्कार ! ओळखलंत का? आपण अनेक रात्री एकत्रित जागरणे केली आहेत, याची आपणास आठवण आहे का? जागरणावेळी मी आनंदी असतो. मात्र, तुमची चिडचिड का होते, हे मला कळत नाही. थोडं संयमाने घ्यायला हवं. या चिडचिडीचा राग तुम्ही स्वतःवरच काढता. हातावर, पायावर तर कधी अनेकदा स्वतःच्या गालातही मारून घेता. असं कोणी वागतं का? खरं तर मी निशाचर आहे. म्हणजे रात्रभर मला झोपच येत नाही. मग मी एकटा जागून काय करू? माझ्याबरोबर कंपनी म्हणून तुम्ही जागं राहिलात तर बिघडतंय का? पण नाही. फॅनचा स्पीड वाढव नाहीतर गुडनाईट का फिडनाईटचं मशिन चालू करून, मला पळवून लावायचा प्रयत्न करता. खरं तर आपलं रक्तही एकच आहे, असं मी मानतो. तुमचंच रक्त माझ्या शरीरात खेळतंय, याची मला नम्र जाणीव आहे. तरीही तुम्ही माझ्याशी असं दुष्टपणे का वागता?
वास्तविक पाहता, गायनक्षेत्रात आमचा हात कोणी धरणार नाही. खरं तर आम्ही खानदानी गायक आहोत. माणसांमध्ये लहान मुलांना सुरवातीला चालायला आणि बोलायला शिकवतात. त्याचप्रमाणे आम्हाला जन्मल्यापासून गुणगुणणं शिकवतात. केवळ गुणगुणण्यावर आम्ही टाळ्या घेतो, एवढे पट्टीचे गायक आम्ही आहोत. टाळ्या वाजवण्याच्या तुमच्या रसिकतेलाही दाद दिली पाहिजे. माणसांमध्ये कोणी गुणगुणण्यावर टाळी घेतं का? माणसातील अनेकजण बाथरूम सिंगर असतात. मात्र, तिथेही ते गाणं गाऊ लागले, की घरातल्या लोकांना कानात बोटे घालवीशी वाटतात. आमचं तसं नाही. आम्ही केवळ गुणगुणू लागलो, तरी तुम्ही सावध होता. तुमचे डोळे आम्हाला शोधू लागतात आणि आनंदाच्या भरात तुमच्याकडून टाळ्यांचा वर्षाव होऊ लागतो. त्यावेळी खरंच आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशावेळी आमच्यातील काहीजण भारावून जातात. ‘आता मेलं तरी चालेल’ अशी भावना व्यक्त करून, खरोखरच मरणाला जवळ करतात.
काही माणसं आमच्यासमोर गुडघे टेकून शरण येतात व म्हणतात, ‘‘आम्हाला चावणं, याच्यावर तुमचा उदरनिर्वाह आहे. हे मान्य आहे. मात्र, चावताना गुणगुणणं हे खरंच आवश्‍यक आहे का? तू तुझा कार्यभाग साधून मुकाट्याने निघून जात जा.’’ अशी विनंती करतात.
‘अरे असं वागायला आम्ही काय चोर आहोत का? गुपचूप येऊन, चोरी करावी, असं आम्ही कधी करत नाही. आम्ही तुतारी फुंकून, रणवाद्ये वाजवत शत्रूंवर चाल करतो. भले त्यात आम्ही आमचा जीव गमवू पण भेकडासारखा हल्ला कधीच करणार नाही.’
‘आम्ही रक्तपिपासू आहोत’ असा आमच्यावर आरोप केला जातो. वास्तविक माणसानं आम्हाला असं म्हणणं हेच हास्यास्पद आहे. कोण रक्तपिपासू आहे, हे अंतर्मुख होऊन, स्वतःला विचारावं.
‘तो तर माझ्यापुढे ‘मच्छर’ आहे, असं एखादी व्यक्ती हेटाळणीच्या सुरात म्हणते. त्यावेळी आमच्या मनाला किती वेदना होतात. डेंगी, मलेरिया, चिकनगुणिया, यलो फीवर आमच्या चावण्यामुळे होतात. यातून आम्ही किती भयंकर आहोत, याची कल्पना आलेली बरी !
तुमच्याकडील फूलदाणीत फुले भरून ठेवतात. गुलाबदाणीत गुलाबाची फुले किंवा गुलाबाचे पाणी असते. मग मच्छरदाणीत मच्छर नको का? त्यात माणूस कसा काय झोपतो? वास्तविक मच्छरदाणी ही आमच्यासाठी असायला हवी. मात्र, दुसऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यामध्ये माणसाचा हात कोणी धरणार नाही.
तुमचं आमचं ‘रक्ताचं नातं’ असल्यानं आम्ही तुम्हाला रात्री- अपरात्री भेटायला येतो. मात्र, आपल्यामध्ये मच्छरदाणीचा पडदा उगाचंच आडवा येतो. तो तेवढा दूर करावा, एवढी विनंती. तेवढंही जमत नसेल तर घरात व आसपास स्वच्छता राखा. पाणी साठवू नका. तुम्हीच ठरवा गुणगुणणं कोणाचं हवंय? आमचं की तुमचं?
----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com