
पुण्यातील १६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित
पुणे, ता. ९ : तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी महावितरणकडून तयार करण्यात आली आहे. यामध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ८७ हजार ५११ वीजग्राहकांनी तीन महिन्यांत एकही वीजबिल भरलेले नाही व त्यांच्याकडे ४२ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. वारंवार आवाहन करूनही ज्या ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम एप्रिल महिन्यापासून सुरू केली आहे. आणखी ७१ हजार ९८ ग्राहकांकडे २९ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे.
पुणे शहरातील २६ हजार ७९६ ग्राहकांकडे ११ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ६ हजार ५३६ ग्राहकांचा ४ कोटी ७१ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर उर्वरित २० हजार २६० ग्राहकांनी थकीत ७ कोटी १२ लाख रुपयांचा ताबडतोब भरणा न केल्यास त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात १६ हजार ३०० ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यांपासून १० कोटी ९१ लाख थकीत बिलांचा भरणा केलेला नाही. आतापर्यंत तीन हजार २०९ वीजग्राहकांचा ३ कोटी ५० लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर आणखी १३ हजार ९१ ग्राहकांकडे ७ कोटी ४१ लाखांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये ४४ हजार ४१५ वीजग्राहकांनी १९ कोटी ९१ लाख रुपयांच्या थकीत बिलांचा भरणा केला नाही. त्यातील ६ हजार ६६९ ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी १६ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर उर्वरित ३७ हजार ७४७ वीजग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाखांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणांहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.