पुणे विद्यापीठाची विनाकारण बदनामी थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठाची विनाकारण बदनामी थांबवा
पुणे विद्यापीठाची विनाकारण बदनामी थांबवा

पुणे विद्यापीठाची विनाकारण बदनामी थांबवा

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः विद्यापीठ हे समाजाचे आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन हवे. पण, काही संघटना दोन ओळीचे पत्रही न देता, कार्यक्रमाचा आशयही स्पष्ट न करता, माध्यमांमध्ये विद्यापीठाला राजकीय आखाडा बनवत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असून, जी-२०च्या महत्त्वपूर्ण बैठकीचेही आयोजनही होत आहे. अशा स्थितीत विद्यापीठाची बाजू समजून न घेता काही संघटनांकडून केवळ बदनामी करण्यात येत आहे, अशी उद्विग्न भावना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाच्या परवानगी संदर्भातील वादामुळे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी हे मत नोंदविले आहे. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यानंतर आता काही विद्यार्थी संघटनांनी पटोले यांना विद्यापीठात निमंत्रित केले आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात, ‘‘कार्यक्रमासाठी सभागृह मिळावे, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्याबाबत तीन मे रोजी कुलसचिवांना पत्र दिले होते. पण, या कार्यक्रमाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. ‘जी-२०’ कार्यक्रम असल्याने त्यादिवशी कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही, असे कळवण्यात आले. परंतु, आम्हाला लेखी काहीही देण्यात आले नाही.’’

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना या संदर्भात विचारले असता. ते म्हणाले,‘‘सर्व राजकीय नेतृत्व विद्यापीठासाठी मार्गदर्शक आहे. मात्र, कार्यक्रम नक्की कोणता होणार? त्यात आशय काय मांडला जाणार याची कल्पना आमच्याकडे लेखी आली नाही. त्यात सध्या विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि जी-२०च्या तयारीसाठी कार्यरत आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक स्पष्टता आली की विद्यार्थी हिताचा निर्णय आम्ही घेऊ.’’

विद्यार्थी हिताच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमचा आक्षेप नाही. फक्त कार्यक्रमाचा आशय आम्हाला समजायला हवा. सध्या विद्यापीठ प्रशासन नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, जी-२० परिषदेच्या बैठकीचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आदींच्या आयोजनात व्यस्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विधायक असलेल्या कार्यक्रमाला आम्ही नाकारत नाही.
- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ