मिळकत कर सवलतीची प्रक्रिया सोपी करण्याची मागणी

मिळकत कर सवलतीची प्रक्रिया सोपी करण्याची मागणी

पुणे, ता. ९ : मिळकत करातील ४० टक्क्यांची सवलत लागू करण्यासाठीची महापालिकेची नवी प्रक्रिया किचकट असून ती सोपी करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सोपी करून ऑनलाइन पद्धतीने लागू करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
मिळकत करातील ४० टक्क्यांची सवलत हवी असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून तो भरून २५ रुपये शुल्कासह महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जमा करायचा आहे. त्यासोबत सदनिका स्वतः वापरत असल्याचा सोसायटीचा ना हरकत दाखला, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅसकार्ड, रेशनकार्ड तसेच पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्याच्या मिळकत बिलाची प्रत आदी कागदपत्रे द्यायची आहेत.
मुळात मिळकत करातील सवलत ही ज्यांना मिळकत कर लागू झाला आहे, त्यांनाच द्यायची आहे. त्यामुळे त्यांचे सर्व रेकॉर्ड महापालिकेकडे उपलब्ध आहे. तसेच ज्यांच्या बाबतीत शंका आहे, तेथे पडताळणी करून कर आकारणी महापालिकेला शक्य आहे. तसेच सोसायटीचा ना हरकत प्रमाणपत्र सर्वांनाच सहज उपलब्ध होईल, अशी पद्धत नाही. मालक - भाडेकरू असा भेद न करता ही सवलत लागू करण्याची गरज आहे. त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणे शक्य आहे. परंतु, सरसकट किचकट प्रक्रिया नागरिकांच्या माथी मारण्याची गरज नाही. तसेच महापालिकेने जी कागदपत्रे मागितली आहेत, त्यांचा आणि कर आकारणीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे मिळकत करातील सवलत लागू करण्यासाठीची प्रक्रिया सोपी करून नागरिकांना दिलासा द्यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या वतीने माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com