गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

परदेशात व्यवसायाचे आमिष
दाखवून महिलेची फसवणूक
पुणे, ता. ९ : परदेशात व्यवसायाचे आमिष दाखवून एका महिलेसह त्यांच्या सहकाऱ्यांची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका २९ वर्षीय महिलेने (रा. पूनम हाईट्स, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीने महिलेला परदेशात व्यवसाय सुरू केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यावरून या महिलेसह त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी २० लाख ८३ हजार रुपयांची ऑनलाइन गुंतवणूक केली, परंतु त्यांना परतावा मिळाला नाही. त्यावर या महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तरुणाच्या ऑनलाइन खात्यांतून जबरदस्तीने काढले पैसे
पुणे, ता. ९ : तरुणाला मारहाण करून गुगल पे खात्यातून सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना नगर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ रविवारी (ता. ७) रात्री घडली. याप्रकरणी राहुल तिवारी (वय २६, रा. संतनगर, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला २५ ते ३० वयोगटांतील चार तरुणांनी पूजेचा प्रसाद देण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. त्यानंतर मारहाण करून गुगल पेद्वारे पैसे काढून घेतले.

जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार
पुणे, ता. ९ : जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना विमाननगर येथे म्हाडा कॉलनीमध्ये रविवारी (ता. ७) रात्री दहाच्या सुमारास घडली. या चाकू हल्ल्यात प्रज्वल नावाचा तरुण जखमी झाला आहे. याबाबत महेश अमृत झेंडे (वय १९, रा. वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लाला सय्यद, सिद्धार्थ घोडके (सर्व रा. म्हाडा कॉलनी) यांच्यासह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी आणि प्रज्वल या दोघांना मारहाण केली. त्यावेळी अली नावाच्या तरुणाने प्रज्वल याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

चंदननगरमधील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय
पुणे, ता. ९ : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चंदननगरमधील स्पा सेंटरवर छापा टाकून एकाला अटक केली. सोमवारी (ता. ८) डेला थाई स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय वसंत कापरे (वय २८, रा. महम्मदवाडी) आणि सुशील संतोष जाधव या दोघांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका परदेशी महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अक्षय कापरे याला अटक केली आहे.

खडकीत २२ किलो गांजा जप्त
पुणे, ता. ९ : खडकी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकींसह २२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. नवीन उमाकांत पिल्ले (वय ३४, रा. खडकी) आणि जितेंद्र कुलदीपसिंग मुलगानी (वय ३२, रा. भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पिल्ले आणि मुलगानी हे दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला, परंतु पोलिसांना पाहताच दोघे दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुणे, ता. ९ : हुंड्याची रक्कम आणि मोटार न दिल्याच्या कारणावरून सासरी सतत मारहाण केल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसर येथील मांजरी परिसरात घडली. शिखा प्रजापती (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विवाहितेचे वडील रामआसरे शिवराम प्रजापती (रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात पती दीपक प्रजापती याच्यासह दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com