खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा

खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता एक रुपयात पीक विमा उतरविता येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने याबाबतची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील पिकापासून या योजनेचा लाभ देणार आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश कृषी विभागाला मिळाला नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी काही काळ अध्यादेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सरकारने ‘पंतप्रधान पीक विमा’ या नावाने ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा एक रुपयांत उतरविता येणार आहे. मात्र, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार, विम्याचा हप्ता कोठे व कधीपासून भरता येणार, नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास, त्या नुकसानीची माहिती किती दिवसात आणि कोणाकडे द्यावी लागणार, विम्याची रक्कम किती मिळणार, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमावली कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या योजनेचे निकष, पात्रता आणि त्यातून मिळणारे फायदे, याबाबतची माहिती अध्यादेश मिळाल्यानंतरच कळू शकणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती

८ लाख २९ हजार ३२९
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या

१ लाख ९५ हजार ७१० हेक्टर
- खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र

६ लाख ६३ हजार ४६२
- एक रुपयांत विमा उतरविण्याचे उद्दिष्ट

१ लाख ५६ हजार ५६८ हेक्टर
- संभाव्य विमा संरक्षित क्षेत्र