पंचनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचनामा
पंचनामा

पंचनामा

sakal_logo
By

भांडणा वाचून करमेना
भेटला वेगळाच नमुना!


‘‘तुमच्याकडे शंभर रुपये सुटे आहेत का?’’ जनूभाऊंनी दुकानदाराला विचारले. त्यावर दुकानदाराने नकारार्थी मान हलवली. ‘पुढच्या दुकानात जा’ असे हातवारे करून सांगितले. जनूभाऊंना हा अपमान वाटला.
‘‘मी पैसे सुटे मागतोय. भीक मागत नाही.’’ त्यांनी आवाज चढवत म्हटले.
‘‘आम्ही असे कोणालाही सुटे पैसे देत नाही.’’ निर्विकार चेहऱ्याने दुकानदाराने म्हटले.
‘‘कोणालाही म्हणजे? मी काय तुम्हाला ऐरागैरा माणूस वाटलो काय?’’ जनूभाऊंनी आवाज चढवत विचारले.
‘‘आमच्या दुकानात काहीतरी खरेदी केल्याशिवाय आम्ही सुटे पैसे देत नाही. हा आमचा नियम आहे.’’ दुकानदाराने म्हटले.
‘‘मग हे आधी सांगता येत नाही का? एक बडीशेपची पुडी द्या.’’ दुकानदारासमोर शंभरची नोट ठेवत जनूभाऊंनी म्हटले.
‘‘एक रुपयांच्या बडीशेपसाठी शंभर रुपये सुटे देता येणार नाहीत. तुम्ही सुटा एक रूपया द्या. मी तुम्हाला बडीशेप देतो.’’ दुकानदाराने पवित्रा बदलला. आत मात्र जनूभाऊंची सटकली.
‘‘तुम्ही दर पाच मिनिटांनी नियम बदलू नका. मला बडीशेपची पुडी द्या आणि ९९ रुपये परत करा.’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘तुम्ही अजून काहीतरी खरेदी करा.’’ दुकानदाराने म्हटले.
‘‘तुमचं हे वागणं नैतिकतेला धरून नाही. तुमच्या दुकानातील वस्तू खपाव्यात म्हणून तुम्ही अशी ग्राहकांवर सक्ती करू शकत नाही. मी तुमच्याविरोधात कोर्टात जाईल.’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘एक रुपयांसाठी आम्ही शंभर रुपये सुटे कसे देणार? तुम्हीही विचार करायला हवा.’’ दुकानदाराने म्हटले.
‘‘म्हणजे मी अविचारी आहे, असं तुम्हाला म्हणायचंय का? मी विचार करून बोलत नाही, असा आरोप तुम्ही माझ्यावर करताय.’’ जनूभाऊ इरेला पेटले होते.
‘‘तुम्ही अजून काहीतरी खरेदी करा. एवढंच माझं म्हणणं आहे.’’ शांतपणे दुकानदाराने म्हटले.
‘‘समोरच्या बरणीमधील एक रुपयाचं चॉकलेट द्या व ९८ रुपये मला परत करा.’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘एकेक रुपयांच्या वस्तू घेऊन, काही होणार नाही. तुम्ही मोठी वस्तू खरेदी करा.’’ दुकानदाराने सुचवले.
‘‘सर्वप्रथम मी तुमच्या या नफेखोरी वृत्तीचा निषेध करतो. तुम्ही सारखे नियम बदलू नका. तुमच्या दुकानातून एकेक रुपयांच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत. फक्त मोठ्या किमतीच्याच करायच्या, असा तुमचा नियम आहे का? तसं असेल तर सांगा.’’ जनूभाऊंनी रागाने म्हटले.
‘‘पण शंभर रुपये तुम्हाला सुटे हवेत कशाला?’’ दुकानदाराने विचारले.
‘‘मी त्या सुट्या पैशांचे काहीही करीन. तुम्ही मला विचारणारे कोण?’’ जनूभाऊंनी विचारले.
‘‘सुटे पैसे द्यायचे की नाही, हा आमचा अधिकार आहे. सुटे पैसे देण्यावरून मला जाब विचारणारे तुम्ही कोण?’’ दुकानदारानेही प्रतिप्रश्‍न विचारला. त्यावर जनूभाऊ थोडे नरमले.
‘‘अहो, पीएमटी बसने मला थोडा प्रवास करायचाय. सुटे पैसे नसतील तर कंडक्टर काहीही ऐकून न घेता, सरळ खाली उतरवतात. अशावेळी फार अपमानास्पद वाटतं हो. त्यामुळे मला सुटे पैसे हवेत.’’ जनूभाऊंनी हळू आवाजात म्हटले.