
संगीत, नाटक विषयावर ‘झपूर्झा उत्सवात’ कार्यशाळा
पुणे, ता. १२ ः झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाच्यावतीने शनिवार (ता. १३) व रविवार (ता. १४) आणि
१८ ते २१ मे या कालावधीत झपूर्झा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा उत्सव खडकवासला धरणाजवळील कुडजे येथील ‘झपूर्झा’च्या वास्तूत होणार आहे. यामध्ये संगीत, नाटक, अभिवाचन, शास्त्रीय गायन आदी कलांचा आस्वाद घेता येणार आहे. शिवाय विविध कार्यशाळांचा लाभ घेता येणार असल्याचे पीएनजी सन्स व झपूर्झाचे संस्थापक अजित गाडगीळ यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक संग्रहालय दिनी (१८ मे) या कार्यशाळांमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. या उत्सवाच्या काळात सकाळी १२ पासून कलाप्रेमी व रसिकांनी ललित कला, चित्र, शिल्प व अन्य कला आणि विविध कार्यशाळांचा आस्वाद घेता येईल. उत्सवात राहुल देशपांडे, प्रल्हाद सिंह टिपणिया, व्यंकटेश कुमार, वैभव जोशी, सावनी शेंडे, हिमांशू श्रीवास्तव, तेजस व राजस उपाध्ये, अमित वेणू आदींचे सादरीकरण होणार आहे.
चैत्राली माजगावकर यांचे पपेट मेकिंगवर, अनिकेत अंबवले यांचे झेंबे वादन, घनश्याम देशमुख यांचा बोलक्या रेषा आदी विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. रघुराज देशपांडे भारतीय रंगावली साकारणार आहेत. गिरीश कुलकर्णी, विभावरी देशपांडे व चंद्रकांत काळे हे ‘आज या देशामध्ये’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिवाचन करणार आहेत. तसेच, चित्रकथीचे सादरीकरण अभिषेक दुखंडे, चलता फिरता बँड सुफी संगीत सादर करणार आहे. याबरोबर प्रिंट मेकिंग, ग्लास पेंटिंग आदी कार्यशाळा होणार आहेत.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगट लक्षात घेऊन उत्सवातील कार्यक्रम व कार्यशाळा आयोजिल्या आहेत, असे गाडगीळ यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.