नवीन आधारकार्ड काढण्यास तूर्तास बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन आधारकार्ड काढण्यास तूर्तास बंदी
नवीन आधारकार्ड काढण्यास तूर्तास बंदी

नवीन आधारकार्ड काढण्यास तूर्तास बंदी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : केंद्र सरकारने एका आदेशान्वये १८ वर्षांपुढील व्यक्तींना नव्याने आधारकार्ड देण्यास तूर्त बंदी घातली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील सर्व आधार केंद्रचालकांना तशा सूचना दिल्या आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युआयडीएआय) नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत असून त्यानंतर नव्याने आधारकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील तालुकास्तरावर एक आधार केंद्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

बनावट आधारकार्ड वाढले
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्‍यक आहे. परंतु, बनावट आधारकार्ड तयार करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा आधारकार्डचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्राने १० वर्षांपूर्वी काढलेल्या जुन्या आधारकार्ड धारकांना अद्ययावतीकरण बंधनकारक करत मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात ६६१ ठिकाणी केंद्र
जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात आधारकार्ड अद्यावतीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिस, शासकीय कार्यालय, इमारतींचे आवार अशा सुमारे ६६१ ठिकाणी मार्च महिन्यात केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांवर केवळ आधार अद्ययावतीकरण आणि लहान मुलांचे नवीन आधारकार्ड काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, १८ वर्षांपुढील व्यक्ती ज्यांना नवीन आधार कार्ड काढायचे आहे, त्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. परंतु, अशा व्यक्तींची संख्या जास्त नाही. युआयडीएआयकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर नवीन आधार कार्ड देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

युआयडीएआयने दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर आणि शहरात एक आधारकेंद्राची व्यवस्था करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरु केले आहे. केंद्र सरकारकडून सूचना प्राप्त होताच १८ वर्षांपुढील आधारधारकांचे नवीन कार्ड काढताना कागदपत्रांची पूर्तता, त्यांची तपासणी, चौकशी अंती पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- रोहिणी आखाडे, आधार समन्वयक

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, शहरासह जिल्ह्यात १० वर्षांपूर्वीच्या जुन्या आधारधारकांसाठी आधार अद्ययावतीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला ३० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधार केंद्रांवर केवळ अद्ययावतीकरण आणि लहान मुलांचे नवीन आधारकार्ड काढून देण्यात येत आहे. १८ वर्षांपुढील ज्या व्यक्तींना नवीन आधारकार्ड काढायचे आहे, त्यांना माघारी पाठविले जात असून ‘युआयडीएआय’कडून नवीन सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील नियोजन करण्यात येईल.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी