
अवतीभवती
शैलजा देशपांडे यांचा बुधवारी गौरव
पुणे, ता. १२ : नदी संवर्धनाबाबत कार्य करणाऱ्या शैलजा देशपांडे यांचा रंगत संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे बुधवारी (ता. १७) सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित केला असून अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार सोहळ्यानंतर ‘पाणी’ या विषयावर कवी संमेलन होणार आहे.
लोकप्रिय गीतांचा रसिकांसाठी नजराणा
पुणे, ता. १२ : सुधीर फडके, राम कदम, श्रीनिवास खळे, जगदीश खेबूडकर अशा दिग्गजांनी संगीतबद्ध केलेली आणि सुलोचनादिदी, रमेश देव, सूर्यकांत, चंद्रकांत अशा प्रसिद्ध कलाकारांवर चित्रित झालेली गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना सोमवारी (ता. १५) मिळणार आहे. पूना गेस्ट हाऊसचे सर्वेसर्वा चारूकाका सरपोतदार यांच्या जयंतीनिमित्त या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. मनिषा निश्चल यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली असून त्यांच्यासह इतर कलाकार गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहे.
रसिकांनी घेतला भरतनाट्यम् नृत्याविष्काराचा रसास्वाद
पुणे, ता. १२ ः भाव, राग आणि ताल ही तीन मुख्य अंग असलेल्या भरतनाट्यमच्या प्रभावी आणि भावस्पर्शी नृत्याविष्काराचा रसास्वाद घेत रसिकांची सायंकाळ संस्मरणीय झाली. निमित्त होते, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर), पुणे विभाग आणि यशस्वी संस्था, पुणे यांच्यातर्फे आयोजित प्रसिद्ध नृत्य कलाकार देबलदेव जाना यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्कार सादरीकरणाचे. नृत्याविष्काराचा प्रारंभ आदि तालातील ‘कीर्तनम’ने झाला. भरनाट्यममधील अभिनयाचा मानबिंदू समजले जाणारे ‘वर्णम’ सादर करण्यात आले. यमन कल्याण रागातील ‘श्रीरामचंद्रम कृपाळू भजनम’ यावर सादर झालेल्या नृत्याने रसिक भारावून गेले. योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आयसीसीआरच्या विभागीय निर्देशक निशी बाला, सल्लागार समितीच्या सदस्या कल्याणी साळेकर, लीना आढाव, यशस्वी संस्थेच्या संचालिका शोभा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
नृत्यनाटिकेतून गोमाता सुरक्षेचा संदेश
पुणे, ता. १२ ः समुद्र मंथनातून गोमाता कामधेनूची उत्पत्ती... गाईची पूजा केल्यामुळे इंद्रदेवाने गोकुळात केलेला पावसाचा कहर... गोकुळवासियांना आणि गाईंना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत... अशा विविध कथांच्या माध्यमातून ‘विश्वमाता गौमाता’ ही नृत्य नाटिका सादर झाली. भारतीय गायींचे महत्त्व आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचवण्याचा आणि संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या नाटिकेतून करण्यात आला. श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी आणि सुरभिवन गौशाळा - ओम प्रकृती धामा ट्रस्ट, कोंपंडावू यांच्यातर्फे या नृत्यनाटिकेचे आयोजन केले होते. याप्रसंगी योगाभ्यासी आचार्य केदारनाथ, प. पू. गुरुजी देवदास राव, कैलासनाथ नंदा आदी उपस्थित होते.